मुंबई-मुंबादेवी मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याचा आत्मविश्वास विद्यमान आमदार अमिन पटेल यांनी व्यक्त केलाय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मुंबादेवी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शायना एनसी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, गेल्या तीन निवडणुकांपेक्षा ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत सोपी असल्याचा दावा अमिन पटेल यांनी केलाय. या मतदारसंघात पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या नसून हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप शायना एनसी सातत्याने करीत आहेत. त्यावर पटेल यांनी शायना यांनी या मतदारसंघातील गल्लीबोळात फेरफटका मारलेला नसल्याने त्यांना मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती नसल्याचा टोला लगावलाय.
विकासकामांचा डोंगर :मुंबादेवी मतदारसंघात गेल्या 15 वर्षांत आपण विकासकामांचा डोंगर उभा केला असून, त्यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार आपल्यावर पूर्णतः समाधानी आहे. तसेच जनतेनं या विकासकामांवर आनंद व्यक्त केल्याचा दावा पटेल यांनी केलाय. 200 कोटी रुपये खर्च करून मतदारसंघात दोन रुग्णालये उभारण्यात येणार असून, त्यासाठी धोरणात्मक मंजुरी सरकारकडून मिळवण्यात आलीय. कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प 33 एकर जमिनीवर करण्यात येणार असून, त्यासाठी टेंडर डॉक्युमेंटदेखील तयार करण्यात आलेत. निवडणुकीनंतर त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती पटेल यांनी दिलीय.