मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं भरभरून मत दिलंय. महायुतीच्या बाजूंनी कौल लागला आहे. निवडणूक निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही महायुतीचे सरकार अजून स्थापन होत नाहीये. पण अखेर आता गुरुवारी 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकीकडे शपथविधीला काही तास शिल्लक असताना दुसरीकडे मात्र महायुतीत अजूनही मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नाही. मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बावनकुळे, दरेकरांनी घेतला आढावा :5 डिसेंबर रोजी महायुतीचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकरांनी आझाद मैदानावरती जाऊन शपथविधी सोहळ्याचे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, काम कुठपर्यंत आले आहे, याचा आढावा घेतला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनीही शपथविधी सोहळ्याचे कशा प्रकारे काम सुरू आहे याचा प्रत्यक्ष आझाद मैदान येथे जाऊन आढावा घेतला. दरम्यान, मंगळवारी भाजपाची बैठक होणार असून, या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. एकीकडे मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नसताना दुसरीकडे मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय.