मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजपा महायुतीला मोठा विजय मिळताना दिसतोय. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुती 200 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला 60 जागा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभेच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि विधानसभा संख्याबळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीचे निकाल एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्यांचे भवितव्य ठरवणार आहेत आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलू शकतात. आज सकाळी ठीक आठ वाजता मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झालीय. सायंकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी निकालाचे कल मान्य करण्यास नकार दिलाय. निवडणुकीच्या निकालाचे आकडे येतात. पण ही लोकशाहीमध्ये झालेली निवडणूक आहे. जनतेला हा कौल मान्य नाही. शिंदेंना 20 च्या वर जागा मिळणे शक्य नसल्याचंही संजय राऊत म्हणालेत.
150 हून अधिक जागांवर बंडखोर :खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय. विधानसभेच्या 288 जागांसाठी सर्व पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी 2086 अपक्ष आहेत. 150 हून अधिक जागांवर बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.