ठाणे-महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी यंदा 4136 उमेदवार रिंगणात आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांची संख्या 28 टक्क्यांनी वाढलीय. तर 2019 मध्ये ही संख्या 3,239 होती. या उमेदवारांपैकी 2,086 उमेदवार हे अपक्ष आहेत. दीडशेहून अधिक मतदारसंघात बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. हे बंडखोर उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीसुद्धा ठाण्यात मतदानाचा हक्क बजावलाय. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय.
महायुतीचंच सरकार पुन्हा बहुमताने राज्यात सत्तेवर येणार, मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
महायुतीने राज्यभरात राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा जनतेला फायदा होतोय. त्यामुळे जनतेच्या जीवावर महायुती पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार आहे, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
Published : 4 hours ago
महायुती पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार : मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या मतांचा अनादर झालेला असून, ही घटना मतदार विसरलेले नाही. त्या घटनेमुळे राज्याची दुर्दशा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. तसेच महायुतीने राज्यभरात राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा जनतेला फायदा होत आहे. त्यामुळे जनतेच्या जीवावर महायुती पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार आहे, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील श्रीनगर भागात आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. एकनाथ शिंदेंनी कुटुंबीयांसह मतदान केल्यानंतर आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चादेखील केली. जनता महायुती सरकारला भरभरून मतदान करणार असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी सरकारनं नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा सकारात्मक परिणाम झाल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.
मतदान हे आपलं पहिलं कर्तव्य :महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. कारण मतदान हे आपलं पहिलं कर्तव्य असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणालेत. तसेच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा बहुमतानं सत्तेवर येणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.
हेही वाचा :