कोल्हापूर -जिल्ह्यात बुधवारी विधानसभेच्या 10 मतदारसंघांत किरकोळ वादावादी आणि हाणामारीचे प्रकार वगळता सर्वत्र मोठ्या उत्साहानं आणि अत्यंत चुरशीने सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 76.25 टक्के मतदान झालंय. सायंकाळी पाचनंतरही उशिरापर्यंत मतदार रांगेत असल्याने मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या विधानसभा निवडणुकीत 74.45 टक्के मतदानासह कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला होता. यावेळीसुद्धा राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या बाबतीत आघाडीवर असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
त्रिस्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात : जिल्ह्यातील 10 मतदारसंघांतील तब्बल 121 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असले तरी बहुतांश सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दुरंगी लढतीचे चित्र आहे. येत्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. मतपेट्या सीलबंद करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्यासाठी त्रिस्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी सांगितलंय.
पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात 7.38 टक्के मतदान:राज्यात नेहमीच मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचे मतदान यंदा विधानसभा निवडणुकीत 80 टक्क्यांहून अधिक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली होती. काल सकाळी सात वाजल्यापासूनच जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात 7.38 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी कागल मतदारसंघात सर्वाधिक 7.78 टक्के मतदान झाले होते. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. काल सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात पहिल्या चार तासांत सरासरी 20.59 टक्के मतदान झालंय. दुपारी तीनपर्यंत सरासरी 54.6 टक्के मतदान झालंय. जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात सकाळी सातपासून मतदारांनी रांगा लावल्यात. एरव्ही दुपारी उन्हामुळे मतदान केंद्र ओस पडत होती, पण दिवसभर वातावरणात गारवा असल्याने मतदान केंद्रावर गर्दीचे सातत्य दिसून आले. दोन्ही बाजूंचे समर्थक दिवसभर आकडेमोड करीत मतदारांनी घराबाहेर पडावे, यासाठी गल्लोगल्ली प्रयत्न करताना दिसत होते. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढतीमुळे सर्व मतदारसंघात निवडणुकीच्या वातावरणाचा अनुभव आलाय.
10 मतदारसंघांत 33 लाखांहून अधिक मतदार :जिल्ह्यात 10 मतदारसंघांत 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. यामध्ये 16 लाख 56 हजार 274 पुरुष, तर 16 लाख 18 हजार 101 महिला मतदारांची संख्या आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात 3 हजार 450 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. 143 ठिकाणी स्थानिक कला, क्रीडा, परंपरेवर आधारित लक्षवेधी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर चार हजार 176 बॅलेट युनिट, तर 3 हजार 452 कंट्रोल युनिट तितकेच व्हीव्हीपॅट होते. तसेच 830 बॅलेट युनिट आणि 767 कंट्रोल युनिट आणि एक हजार 32 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात दिव्यांग मतदार 27 हजार 465 तर 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 38 हजार 331 मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 16 हजार 237 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते.
नेत्यांच्या धावत्या भेटी :प्रत्येक प्रभाग आणि मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार आवाहन करण्यात येत होते. शहरातील गल्लोगल्ली कार्यकर्ते झटताना दिसत होते. कोणत्या भागातून किती मतदान झाले याचा कानोसा घेऊन मतदारांना नेले जात होते. प्रमुख नेतेमंडळी विभागात फिरून मतदार आणि आपल्या समर्थकांना आवाहन करताना दिसत होते. उमेदवारही मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देण्यात व्यस्त होते.