ठाणे : शहापुरातील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर दिनेशकुमार चौधरी यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात दिनेशकुमार चौधरीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आज (रविवार) शहापूर शहरातील शेकडो व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी केलीय. तसंच पोलीस गस्त वाढवून नागरिकांसह व्यापाऱ्यांचं संरक्षण करावं. यासाठी पोलीस ठाण्यावर व्यापाऱ्यानी मोर्चा काढल्यानं पोलीस प्रशासनावर आरोपींना अटक करण्यासाठी दबाव वाढत आहे.
काय आहे घटना? : दिनेशकुमार हा महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात सेल्समनचं काम करत होता. तो नेहमीप्रमाणे दुकान मालकासह शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुकानात बंद करून आपल्या घरी निघाला होता. त्यांच्यासोबत दोन कामगारदेखील दुकानात होते. सर्वजण दुकान बंद करून निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चौधरी याच्यावर गोळीबार केला. यावेळी भाजीविक्री करणारी महिला मदतीसाठी धावली. तेव्हा दोन्ही हल्लेखोरांनी तिलाही धमकावलं. गोळीबारात चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आलं. मात्र, आज (रविवार) पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
तीव्र आंदोलनाचा दिला इशारा : दिनेशकुमारच्या मृत्यूचा निषेध करत आज संपूर्ण शहापूर शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. तसंच संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा कढला आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करून आरोपीला अटक करावी. जर 48 तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, माजी आमदार पांडूरंग बरोरा यांनी दिला आहे.
व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण : वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "दिनेशकुमार हा सेल्समन म्हणून दुकानात कामाला होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणं दुकानात बंद करून मालक आणि दिनेश रस्त्यानं जात होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मालक आणि सेल्समनवर गोळीबार केला. त्यांनी सेल्समनजवळ असलेली बॅग पळवली. या बॅगमध्ये महत्वाची कागदपत्रं असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी आता शहरात आणि नाशिक, मुंबई महामार्गावरील इतरही सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केल्यावर गोळीबाराचं कारण समोर येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडं या गोळीबाराच्या घटनामुळं व्यापारीवर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी व्यापारी संघटना करीत आहेत.
हेही वाचा -