मुंबई-वडाळा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातला महत्त्वाचा मतदारसंघ असून, आठ वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर यांना भाजपानं पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर हे शिवसेना पक्षातर्फे पाच वेळा नायगावमधून निवडून आलेत, तर तीन वेळा वडाळ्यातून ते आमदार राहिलेत. वडाळा विधानसभेची जागा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्या मतदारसंघाचे प्रमुख स्थान आहे. वडाळ्याचा परिसर पश्चिमेला दादर, वायव्येला माटुंगा आणि दक्षिणेला शिवडी या भागांनी वेढलेला आहे, त्यामुळे ते मुंबई शहराचे मध्यवर्ती उपनगर बनलंय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात एकाच वेळी निवडणुका होत असल्यानं 20 नोव्हेंबर रोजी मतदान असून, 23 रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचा राज्याच्या राजकारणात बराच काळ महत्त्वाचा वाटा राहिलाय. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात तेढ निर्माण झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आलेत.
राजकीय इतिहास अन् निवडणूक समीकरणे:2006 ते 2014 दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि मतदारसंघात आपला दबदबा कायम राखला. 2009 पासून वडाळा विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक मनोरंजक ट्विस्ट पाहायला मिळालेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी झाले होते. त्यावेळी कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या विजयाने वडाळ्यात काँग्रेसची स्थिती मजबूत झाली होती. 2014 मध्येसुद्धा त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि आपला विजय कायम ठेवत 38,540 मते मिळविली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मिहीर कोटेचा यांना 37,740 मते मिळाली. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यावर त्यांनी 800 मतांनी विजय मिळवला. यानंतर कोळंबकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघात कोळंबकर यांना 56 हजार 485 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मते मिळाली होती. या निवडणुकीतील कोळंबकर यांच्या विजयाने त्यांची वैयक्तिक लोकप्रियता पक्षापेक्षा वरचढ असल्याचे सिद्ध झाले.