मुंबई - 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी वाढलीय. राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदानाची नोंद झाली असून, सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय. तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झालंय. 1995 नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झालंय म्हणजेच महाराष्ट्रात यंदा 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान झालंय. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे पाहता वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कुणाला होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा भाजपा आणि महायुतीला होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
वाढलेली मतदानाची टक्केवारी सरकार विरोधात? : राज्यात यंदा 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या विजयाचा दावा केलाय. वाढलेल्या मतदानाने कोणाचे पारडं जड होईल हे 23 नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या वाढीव मतदानासाठी काही महत्त्वाचे फॅक्टर कारणीभूत आहेत. ते म्हणजे, वाढलेले मतदान हे सरकारविरोधात की सरकारसोबत याची चर्चा सुरू झालीय. आतापर्यंत वाढलेल्या मतदानाचा फटका हा सरकार विरोधात असतो, असा अंदाज साधारणपणे काढला जातोय. कारण काही अपवादात्मक परिस्थिती बघता वाढीव मतदान हे सरकार बदलण्यासाठी असते. या कारणाने महायुती सरकारविरोधात लोकांनी आपला संताप मतदानातून व्यक्त केलाय का, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
मतदानाची टक्केवारी का वाढली?:लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यास कारणीभूत आहे का, याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे वाढलेली महागाई, महिलांवरील अत्याचार आदी कारणांनी त्रस्त झालेल्या महिलांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये महायुतीकडून भाजपातर्फे, "बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है" या मुद्द्यावर निवडणुकीतील रणनीती बदलली गेलीय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जनतेला भावनात्मक अपील करून गद्दारांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा आणि गाडून टाका, असं आवाहन केलंय. यातच निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मतदानासाठी पैसे वाटल्याचा आरोप झालाय. सोबतच मतदान बुधवारी झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याकारणाने अनेक मतदारांनी बाहेरगावी न जाता मतदानाचा हक्क बजावलाय. या कारणाने मतदानाची टक्केवारी वाढलीय, असेही संकेत मिळत आहेत.
वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा महायुतीला फायदा :आजपर्यंतचा मागील अनुभव पाहता महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलीय, त्याचा फायदा हा भाजपाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना झालाय, त्याकरिता महाराष्ट्रामध्ये भाजपाने मित्र पक्षांचे सरकार स्थापन केलंय, असा महत्त्वाचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मतदानाची टक्केवारी वाढली हे महायुतीला फायदेशीर होणार, असे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. त्याचबरोबर राज्यातील महिला मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढल्याने त्याचाही फायदा महायुतीला होईल, असंही ते म्हणालेत.
हेही वाचा...
- अदानींकडून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीसह भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधींची लाच, अमेरिकेत गंभीर आरोप
- गौतम अदानी यांच्याकडून भारताला हायजॅक, अटक होणार नाही-राहुल गांधी