महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Man of the Moment : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, जाणून घ्या राजकीय कारकीर्द

नगरसेवक पदापासून ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर अन् महाराष्ट्राचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मजल दरमजल करत राजकीय प्रवास केलाय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 18 hours ago

Updated : 17 hours ago

मुंबई : '‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा,’ अशी ओळ देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला म्हटली होती, ती आज त्यांच्यासाठी तंतोतंत लागू पडतेय. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच दिलं जातंय. खरं तर या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा पुढचा टप्पा आतापासूनच सुनिश्चित झालाय. नगरसेवक पदापासून ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर अन् महाराष्ट्राचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मजल दरमजल करत राजकीय प्रवास केलाय. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज झालेत.

देवेंद्र ही नागपूरची देशाला मिळालेली देणगी :मराठ्यांसह ओबीसींसारख्या जातीचं राज्यात राजकारणात प्राबल्य आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. महायुतीमधील शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता. आता देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून समोर आलेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मृदुभाषी अन् चारित्र्यवान नेता म्हणून देवेंद्र फडणवीस प्रसिद्ध होते. मुख्यत्वे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह या दोघांच्याही जवळचे होते. ‘देवेंद्र ही नागपूरची देशाला मिळालेली देणगी आहे,’ असे मोदींनी एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना म्हटलं होतं. 2014 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी प्रचाराचा धडाका लावला असला तरी निवडणुकीत पक्षाच्या अभूतपूर्व विजयाचे श्रेय भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आले होते. जनसंघाचे पुत्र आणि भाजपाचे दिवंगत नेते गंगाधर फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस पुत्र आहेत. तसेच गंगाधर फडणवीस यांना नितीन गडकरी त्यांचे "राजकीय गुरू" मानत होते. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तरुण वयातच आपल्या राजकारणाची झलक दाखवून दिली होती. पहिल्यांदा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले, तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते. 1989 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत प्रवेश मिळवला.

अडीच वर्षांच्या कार्यकाळात फडणवीसांचं लक्षणीय काम :22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नगरसेवक आणि 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ते सर्वात तरुण महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी 1999 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झालेत. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्याने त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ते सध्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मोठा झटका बसला होता, कारण तत्कालीन शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून निवडणूकपूर्व युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपा नेत्याच्या बहुचर्चित “मी पुन्हा येईन” या विधानाला आरसा दाखवला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकीने देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय वाटचालीत नाट्यमय बदल घडवून आणला. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून युती तोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या मदतीनं पहाटेचा शपथविधी उरकला. परंतु हे सरकार मात्र अल्पायुषी ठरले आणि अवघ्या 72 तासांनंतर कोसळले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. तसेच एकनाथ शिंदे भाजपाच्या पंगतीत बसले आणि मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार झाले. त्यावेळी राजकीय विश्लेषणकांना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे वाटले. परंतु भाजपा नेतृत्वानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर बसवून धक्कातंत्राचा वापर केला आणि देवेंद्र फडणवीसांना अनिच्छेने का होईना उपमुख्यमंत्रिपद घेण्यास भाग पाडले. उपमुख्यमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी लक्षणीय काम केलंय. परंतु शनिवारी जे निकाल लागले त्यातील संख्याबळानुसार पुन्हा भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं.

देवेंद्र फडणवीसांची स्वतःची वेगळी राजकीय ओळख :खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंब हे राजकारणात सक्रिय होतं. त्यांचे वडील आणि काकू दोघेही आमदार होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ हे सुशासन अन् प्रभावी राजकीय डावपेचांचं वैशिष्ट्य होते. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी विशेषत: शहरी मतदारांची पसंती मिळवली. मात्र, त्यांचा कार्यकाळ आव्हानात्मक राहिलेला आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे राज्यातील पिकांचे लक्षणीय नुकसान झालं आणि प्रभावित शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारल्याने त्या काळात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यांच्या कार्यकाळातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाची शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी होती. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा केला असला तरी त्यानंतरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हा कायदा मोडीत काढल्याने मराठा समाजातील अनेक जण असंतुष्ट झाले आणि या अपयशासाठी मराठा समाजाने देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भाजपा नेतृत्वाने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये परत येण्याची सूचना केली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस नाखूश असले तरी फडणवीसांनी पक्षनेतृत्वावरील निष्ठा दाखवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांनी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जागावाटपाची बोलणी घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली.

देवेंद्र फडणवीस नेमके कोण? : 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे जन्मलेल्या देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारचे नेतृत्व केलंय. त्यांनी 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत सेवा बजावली. देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ गेल्या 47 वर्षांत संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम आहे. वयाच्या 44 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांनंतर राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. तसेच देवेंद्र फडणवीस हे भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर ठरले. वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपुरातील सर्वात तरुण महापौर बनले, तर वयाच्या 21 व्या वर्षी ते नगरसेवक झाले. विशेष म्हणजे 2002-2003 मध्ये त्यांना कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तर 2016 मध्ये त्यांना विदर्भातील उत्कृष्ट कार्यासाठी नागभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलंय. एक चतुर राजकारणी अन् संयम बाळगणारा माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस परिचित आहेत, फडणवीसांना राजकारणातील चाणक्यही म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीस सदोदित भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून अलिप्त राहिलेत. कथित सिंचन घोटाळ्यावरून मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला त्यांनी कोंडीत पकडले होते. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

पंतप्रधान वाजपेयींकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक : केंद्रात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार होते, तेव्हा नागपूरचे रहिवासी असलेले अधिवक्ता आप्पासाहेब घटाटेंनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना देवेंद्र फडणवीसांबद्दल सांगितले होते. त्यानंतर वाजपेयींनीही देवेंद्र फडणवीस या आमदाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अधिवक्ता घटाटे यांच्यासोबत दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केले. राजकीय निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांचे वर्णन संयमाने ऐकणारे आणि विविध क्षेत्रांतील विस्तृत ज्ञान असलेले कार्यकर्ते म्हणून केले जाते. ते एक उत्तम राजकारणी म्हणूनही ओळखले जातात, जे लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मराठा आरक्षण, जलयुक्त शिवार जलसंधारण योजना, नागपूर-मुंबई कॉरिडॉर, शेतकरी कर्जमाफी आणि मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार अशी अनेक विकासकामं त्यांनी केली. मराठा आरक्षण आंदोलनामुळे त्यांच्या सरकारचे अस्तित्व धोक्यात आले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संपर्क साधला, तसेच नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणाच्या मागणीला मान्यता देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आणि एक कायदा केला. तसेच कर्जमाफीची रक्कम बँकांना देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली :खरं तर राजकारणात येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील एका कपड्याच्या दुकानात मॉडेल म्हणून काम केले होते आणि ते ज्या जाहिरात मोहिमेचा भाग होते, ती जाहिरात प्रचंड यशस्वी झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता दोघांनी ‘मुंबई रिव्हर अँथम’ नावाच्या टी-सीरीज म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलंय. आणीबाणीच्या काळात वडिलांच्या अटकेमुळे त्यांनी स्थानिक इंदिरा कॉन्व्हेंट शाळेत जाण्यास नकार दिला होता, कारण त्या शाळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव दिले होते. त्याऐवजी ते शिक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालित सरस्वती विद्यालयात गेले. देवेंद्र फडणवीस यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे. ते नागपूरच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE बर्लिनमधून प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिप्लोमादेखील आहे. त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय व्यस्ततेत त्यांनी भिंती रंगवणे आणि राजकीय पोस्टर्स पेस्ट करण्याचे काम केले, तळागाळातील राजकारणात त्यांचा तो प्रारंभिक प्रवेश होता. लहान वयातच म्हणजे 17 वर्षांचे असताना त्यांनी वडील गमावले.

देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

2022:30 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय, जेव्हा भाजपाने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटासह सरकार स्थापन केलंय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विस्तार, शहरी नूतनीकरण आणि औद्योगिक वाढ याला प्राधान्य दिलंय आणि महाराष्ट्राला एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून स्थान दिलंय.

2019: 23 नोव्हेंबर रोजी प्रचंड राजकीय गोंधळानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले. मात्र अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला.

2014:31 ऑक्टोबर 2014 रोजी जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते 44 वर्षांचे होते, ज्यामुळे ते राज्याच्या सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांपैकी एक बनले.

2013:2013 मध्ये देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला गती मिळाली.

2010:भाजपाच्या महाराष्ट्रातील महासचिव म्हणून नियुक्ती.

2009:देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवली आणि पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे विकास पांडुरंग ठाकरे यांचा पराभव केलाय.

2004:फडणवीस यांनी नागपूर पश्चिममधून राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रणजित देशमुख यांचा 17,610 मतांनी पराभव केला. 2001 ला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले.

1999:ते नागपूर पश्चिममधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांच्यावर अवघ्या 9087 मतांनी विजय मिळवला.

1997:भारतातील दुसरा सर्वात तरुण महापौर बनले; वयाच्या 27 व्या वर्षी ते 1997 मध्ये नागपूरचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर बनले.

1992: वयाच्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक बनून 1992 मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि सलग दोन वेळा नगरसेवकपद भूषवले. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नाव घराघरात पोहोचले.

1990: 1990 च्या दशकात राजकीय कारकीर्द सुरू केलीय.

1986:1989 महाविद्यालयीन काळात फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि नागपूर महापालिकेच्या राम नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेत. त्यानंतर केवळ पाच वर्षांच्या कालावधीत ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले.

हेही वाचा-

  1. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब ? केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण मुंबईत दाखल
  2. महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना! मुंबई दौऱ्यापूर्वी विजय रुपाणी काय म्हणाले?
Last Updated : 17 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details