मुंबई : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर नेण्याचे धेय्य अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी नेते पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याची मुदत सातत्याने पुढे ढकलत आहेत, अशी टीका देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मुंबईत टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत केलीय. पाच ट्रिलियनचे धेय्य गाठण्याची मुदत वर्षानुवर्षे पुढे जातेय. खरं तर हे लक्ष्य 2022-23 पर्यंत गाठण्याचे धेय्य होते, मात्र ते 2027-28 पर्यंत पुढे ढकललं गेलंय. मात्र हे लक्ष्य वेळेत गाठले जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेग वाढण्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात अपेक्षित वेग गाठला जात नसल्याकडे पी. चिदंबरम यांनी लक्ष वेधले. देशाची अर्थव्यवस्था कधी ना कधी पाच ट्रिलियनच्या वर जाईल, तेव्हा प्रत्येक राज्याचा हिस्सा वाढेल हे साहजिक आहे, मात्र हे लक्ष्य गाठताना किती वेळात गाठणार हे महत्त्वाचे ठरते, असंही त्यांनी सांगितलंय. आपण पाच ट्रिलियनच्या उद्दिष्टावर का थांबतोय, 10 किंवा 20 ट्रिलियनचे स्वप्न का बघत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
धर्माच्या नावावर मतं मागणं चुकीचं :कोणीही कोणत्याही धर्माच्या नावावर मते देण्याचे आवाहन करणे, तसेच धर्माच्या नावावर मते मागणं चुकीचं आहे. मतदारांनी धार्मिक मुद्द्यांवर मतदान करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलंय. महाराष्ट्राची सातत्याने होत असलेली घसरण रोखण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलंय. द्वेषाचे वातावरण पसरवून समाज आणि धर्मामध्ये भेद निर्माण करणं चुकीचं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य एकतेसाठी नाही तर विभाजनासाठी आहे. सर्वांना एक करण्याऐवजी एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात लढवण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केलीय.
आर्थिक राजधानी राहील की नाही याबाबत शंका :महाराष्ट्र देशात उद्योग, कृषी क्षेत्रात आघाडीवर होता. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. मात्र , सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे भविष्यात राहील की नाही याबाबत त्यांनी साशंकता आहे. काँग्रेसच्या कालावधीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर होता. मागील 8 ते 10 वर्षांत परिस्थिती बदललीय. जीडीपी दर खालावला असून, विकास दर घसरत चाललाय. राज्याची कामगिरी सर्व क्षेत्रात खालावलीय. राज्याची अर्थव्यवस्था कर्ज काढून उसनवारीवर चालली आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. 18 हजार 300 चालक पदांसाठी 11 लाख अर्ज आले होते. तलाठी पदासाठीदेखील लाखोंच्या संख्येने अर्ज आलेत. राज्यातील तरुणांना राज्यात नोकरी मिळत नाही. नितीन गडकरींनी नोकऱ्या कुठे आहेत, प्रश्न विचारला होता, खरे म्हणजे त्यांनी उत्तर द्यायला हवे, राज्य सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नाही, असे टीका चिदंबरम यांनी केलीय. मतदान करताना या सर्व बाबींची जाणीव ठेवून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केलंय.