मुंबई -राज्यात नकारात्मक वातावरण पसरवून आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार भाजपा आणखी किती काळ करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करत भाजपा मते मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलीय. मुंबईतील चांदिवली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांंच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
बटेंगे तो कटेंगे नही, पढोगे तो बढोगे; सचिन पायलट यांचा नवा नारा - SACHIN PILOT MUMBAI VISIT
राज्यात मविआला अनुकूल वातावरण असून, मविआ सत्तेवर येईल, असा विश्वास पायलटांनी व्यक्त केलाय. तसेच बटेंगे तो कटेंगे नाही, पढोगे तो बढोगेचा नवा नाराही त्यांनी दिलाय.
Published : Nov 14, 2024, 1:23 PM IST
भाजपा सध्या बॅकफूटवर :बटेंगे तो कटेंगे असा दुष्प्रचार आणखी किती काळ करणार, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. याऐवजी पढोगे तो बढोगे हा आपला नारा असल्याचे पायलट म्हणालेत. राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर नसीम खान यांच्यावर मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, त्यामुळे नसीम खान यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन पायलट यांनी केलंय. भाजपाची धोरणे जनतेला कळून चुकल्याने भाजपा बॅकफूटवर आहे आणि काँग्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर असलेल्यांनी शालिनतेने व्यवहार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय. तसेच द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा, विकासाला खीळ घालण्याचा आणि देशाची शांतता भंग करून सौहार्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केलंय.
सर्वांगीण विकासासाठी विजयी करा :महाराष्ट्रातील जनतेने 400 पार ची घोषणा देणाऱ्यांना 240 वर रोखलं, तशीच कामगिरी करून संविधानवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन सचिन पायलट यांनी केलंय. जाती, धर्म, भाषा यावर लक्ष न देता देशाच्या एकात्मतेला बळकट करणाऱ्यांच्या मागे सशक्तपणे उभे राहण्याची गरज आहे, असंही सचिन पायलट यांनी अधोरेखित केलं. यावेळी उमेदवार आरिफ नसीम खान, साधू कटके आणि पदाधिकारी उपस्थित होते. नसीम खान यांनी या निवडणुकीत कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करावे, असंही जनतेला आवाहन केलंय.
हेही वाचा :