महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी बाहेरची असल्याचा आरोप चुकीचाच, मी स्थानिकच आहे, शायना एनसीचं विधान - SHAINA NC

मुंबादेवी मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मी रिंगणात असून, बाहेरची असल्याचा आरोप चुकीचा आहे, मी स्थानिकच आहे, असंही शायना एनसी म्हणाल्यात.

Interview with Shayna NC
शायना एनसी यांची मुलाखत (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2024, 3:55 PM IST

मुंबई-विधानसभा निवडणुकीची राज्यात धामधूम सुरू असून, अनेक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करीत आहेत. दक्षिण मुंबईतल्या मुंबादेवी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून शायना एनसी निवडणूक लढवत आहेत. शायना एनसी यांच्या विरोधात काँग्रेसचे अमिन पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चूरस निर्माण झालीय. एका कार्यक्रमादरम्यान दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंतांनी शायना एसीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटलेत. शायना एनसी या बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते. त्यावर आता शायना एनसीनंच खुलासा केलाय. माझ्यावर मी मतदारसंघाबाहेरील असल्याचा करण्यात येत असलेला आरोप पूर्णतः चुकीचा आणि गैरसमज पसरवणारा आहे. मी याच भागातील स्थानिक असून, या मतदारसंघात माझे आजोळदेखील असल्याची माहिती शायना यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिलीय.

मी बाहेरची उमेदवार असल्याचं म्हणणं योग्य नाही :तसेच यावेळी शायना एनसी यांनी आपल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार अरविंद सावंत यांचासुद्धा समाचार घेतलाय. आदित्य ठाकरे मातोश्रीत राहत असून वरळीतून लढतोय, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते हे बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतायत. त्यामुळे मी बाहेरची उमेदवार असल्याचं म्हणणं योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुंबादेवी मतदारसंघात गेल्या तीन वेळा विजयी झालेल्या आमदारांनी काहीही भरीव काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामुळे दक्षिण मुंबईत राहूनदेखील या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आता आपण या मतदारसंघातून विजयी झाल्यावर या मतदारसंघातील मतदारांच्या सर्व प्रमुख प्रलंबित समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार असल्याची ग्वाही त्यांनी मतदारांना दिलीय.

शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यासोबत खास संवाद (Source : ETV Bharat Reporter)

आता परिवर्तन घडवण्याची वेळ:कामाठीपुरा आणि कुंभारवाड्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. तिकडचा विकास करणं महत्त्वाचं आहे. इथल्या खासदार आणि आमदारांनी 15 वर्षांत काम केलेलं नाही. त्यामुळे आता परिवर्तन घडवण्याची वेळ आली असून, मला निवडणुकीत संधी द्या, असं आवाहनही शायना एनसी यांनी केलंय. शायना एनसी यांना प्रचारात सेलिब्रिटी असणार का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, मी स्वतः प्रचार करीत आहे. मला जनतेतून चांगलं समर्थन मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला चांगला पाठिंबा मिळतोय, असंही शायना एनसी यांनी सांगितलंय. तसेच लाडकी बहीण योजनेचाही जनतेला खूप फायदा होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबादेवीतल्या अनेक बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचं पैसे आले असून, महायुती सरकार जनतेसाठी चांगलं काम करीत असल्याचंही शायना एनसी यांनी अधोरेखित केलंय.

हेही वाचा :

  1. मनसेचे ९९ आमदार निवडून येणार, मनसेच्या एकमेव आमदाराचा दावा; शिवसेना परतफेड करणार का?
  2. MNS Thackeray Group Alliance : 'युतीपेक्षा भीतीच जास्त'; युतीच्या चर्चेवरून एकमेव मनसे आमदाराचा ठाकरे गटाला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details