हैदराबाद : दीन दुबळ्यांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे त्यांचे देशभरातील लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जातात. जातीय द्वेशातून शाळेबाहेर बसून शिक्षण घेणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल हा दीनदुबळ्यांचा दीपस्तंभ होण्यापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. मात्र भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना अहोरात्र कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या शाळेबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास, यातील काही घडामोडी आम्ही खास आमच्या वाचकांसाठी इथं देत आहोत.
कुठं झाला बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म :बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असं होतं. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या गावाचे होते. मात्र त्यांचे वडील रामजी सकपाळ हे इंग्रजांच्या सैन्य दलात सुभेदार होते. रामजी सकपाळ यांची नियुक्ती मध्य प्रदेशातील महू इथं इंग्रजी सैन्याच्या वसाहतीत होती. याच महू इथल्या सैन्य वसाहतीत 14 एप्रिल 1891 ला भीमराव यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी छोट्या भीमरावांना साताऱ्यातील शाळेत शिक्षणासाठी पाठवलं. त्यांच्या गावाच्या नावावरुन शिक्षकांनी त्यांचं नाव भीमराव रामजी आंबडवे असं दाखल केलं. मात्र आंबडवे हे नाव उच्चारण्यास अवघड असल्यानं त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना त्यांचं आंबेडकर हे नाव दिलं. तेव्हापासून भीमराव रामजी आंबेडकर हे नाव पुढं रुढ झालं.
कसं झालं बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण : भीमराव आंबेडकर यांचा जन्म महू इथल्या सैनिकी छावणीत झाला. मात्र शिक्षणासाठी त्यांना सुभेदार रामजी सकपाळ यांनी सातारा इथल्या शाळेत पाठवलं. याच शाळेत छोट्या भीमरावांचं प्राथमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचं काही शिक्षण मुंबईत झालं. मात्र पुढं त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतल्यानंतर, मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अशा जगातील नामांकित शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलं. जगातील हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे नावारुपाला आले. बीए, एम ए, पीएचडी, बार अॅट लॉ, डी एस्सी, आदी पदव्या उच्च पदव्या त्यांनी मिळवल्या. तर एलएलडी आणि डी लिट या सर्वोच्च पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कोणी कोणी केली बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत :सुभेदाराचा हुशार मुलगा म्हणून भीमराव यांचा लौकिक असला, तरी त्यांना शिक्षणासाठी खूप हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. त्यामुळेच परदेशातील शिक्षणासाठी त्यांना शाहु महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी मोठी केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेत शिक्षण घेता आलं. सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा पब्लिक सर्व्हिसमध्ये नोकरीही दिली. कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्रासाठी मदत केली. बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्यानंतर शाहु महाराजांनी त्यांना मदत सुरुच ठेवली. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशात सयाजीराव गायकवाड आणि शाहु महाराज यांचा मोलाचा वाटा आहे.
बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, पत्रकारिता, कामगार चळवळ या विषयात जबरदस्त लेखन केलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या "द प्रॉब्लेम ऑफ रुपी" हा शोधप्रबंध आजही अनेक अर्थतज्ज्ञांना मार्गदर्शक ठरतो. बाबासाहेब आंबेडकर यांचं 'वेटींग फोर अ व्हिसा' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 20 पानी आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात शिकवण्यात येते. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकं आणि ग्रंथाचं लिखाण केलं. यात 'बुद्ध आणि त्यांचा धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, अन्हिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑफ पाकिस्तान, शूद्र पूर्वी कोण होते? अशा ग्रंथ संपदांचा समावेश होतो.
बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण :घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर आपलं जीवन दीनदुबळ्यांच्या कैवारासाठी झिजवलं. त्यांच्या कठोर साधनेमुळेच त्यांना द नॉलेज ऑफ सिम्बॉल असं संबोधलं जाते. मात्र दीनदुबळ्यांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीत 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांच्या महारिनिर्वाणानं गोरगरीब दीन दुबळा समाज पोरका झाला. त्यांच्या निधनाच्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं संबोधलं जाते. बौद्ध धर्मात परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण असा अर्थ होतो. जो व्यक्ती निर्वाण होतो, तो सगळ्या सांसारिक भ्रमापासून मुक्त होत असल्याची संकल्पना बौद्ध धर्मात आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिवस' असं संबोधतात. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून मानवंदना . . .!