लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नाशिक दौरा नाशिकRaj Thackeray :2006 रोजी मनसेची स्थापना झाली. 2007 मध्ये मनसेने महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या . यात मुंबई महानगरपालिकेत 7, पुणे महानगरपालिकेत 8, नाशिक महानगरपालिकेत 12 आणि ठाणे महानगरपालिकेत तीन नगरसेवक निवडून आले. (LokSabha Elections 2024) यानंतर नाशिकमध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज्यात 13 आमदार निवडून आलेत. यात नाशिक शहरातील 3 आमदार होते. यानंतर 2012मध्ये राज ठाकरे यांच्या करिश्मा जादूनं नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला. तब्बल 40 जागांसह सलग पाच वर्ष मनसेने नाशिक महानगरपालिकेवर सत्ता उपभोगली. मात्र 2017 च्या निवडणुकीत मोदीच्या लाटेमुळे अवघ्या पाच जागांवर मनसेला समाधान मानावं लागलं.
विकासकामे करूनही मनसेला मतदान नाही:नाशिकमध्ये इतकी विकासकामे करूनही जर नाशिककर मतदान करणार नसतील तर कोण कशाला येथे पुन्हा येईल? असा सवाल करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरांवर नाराजी व्यक्त केली होती. याच काळात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्यानं अनेकांनी मनसेची साथ सोडली होती. आम्ही पक्ष स्थापन होण्याच्या आधीपासून कामं केली. लोकांच्या पक्षाकडून अपेक्षा फार होत्या. पण, एसीमध्ये बसून राजकारण करणाऱ्या चौकडीचं राज साहेबांनी ऐकलं. त्यांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला असता तर कुणी सोडून गेलं नसतं असं म्हणत नाशिकचे मनसेचे प्रमुख नेते माजी आमदार वसंत गीते मनसे बाहेर पडले. तेव्हा त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक माजी नगरसेवकांनी मनसेला राम-राम ठोकला.
म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल:सध्याच्या स्थितीमध्ये अनेक प्रमुख नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे. मात्र असं असलं तरी मनसेची ताकद नाशिकमध्ये कमी झाली, पण संपलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा मंच वापरून पक्षाला पुनर्जीवित करण्याची संधी राज ठाकरेंकडे आहे, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे. त्याचमुळे राज ठाकरे शहर दौऱ्यावर आहेत. असं असताना मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं:2009 मध्ये मनसेचे तीन आमदार, 2012 मध्ये नाशिक महापालिकेवर तब्बल 40 नगरसेवक निवडून देत महानगरपालिकेची सत्ता नाशिककरांनी राज ठाकरे यांना देऊ केली होती. तेच दिवस पुन्हा आणण्यासाठी राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र आता राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. तर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते इतरत्र पक्षात जातील अशीदेखील भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकसभा नंतरच्या विधानसभा, महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा:
- ''केंद्र सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो...'' सर्वसामान्य मुंबईकरांच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
- अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची 'हमी' - मोदी
- 'माझ्या हातातला झेंडा फडकला, अन् डोळ्याचं पारणं फिटलं'; सर्वात लहान कारसेविका म्हणून नोंद झालेल्या गीतांजली ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा