मुंबईLok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. जाहीर सभांना अद्याप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली नसली, तरी जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट, रिल्स यावरुन प्रचाराला सुरुवात झाली आहे. "समाज माध्यमांमधून केला जाणारा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचं 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांवरुन स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 2019 पासून, समाज माध्यमांवरील प्रचारही निवडणूक आयोगाने खर्चाच्या कक्षेत आणला आहे. दररोज पक्ष अथवा उमेदवारांकडून समाज माध्यमांवर पोस्ट केल्या जाणाऱ्या रिल्स आणि अन्य माहितीची दखल निवडणूक आयोग घेत असते. या माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या जाहिराती आणि केल्या जाणाऱ्या पोस्ट यासाठी येणारा खर्च हा निवडणूक आयोग आता संबंधित उमेदवाराच्या आणि त्या पक्षाच्या खात्यात जमा करीत असतो. त्यामुळे प्रचार थांबल्यानंतर याबाबतीत कोणत्या उमेदवाराने अथवा कोणत्या पक्षाने किती खर्च केला याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होते," अशी माहिती निवडणूक आयोगातील सहमुख्यअधिकारी मनोहर पारकर यांनी दिली आहे.
समाज माध्यमांवरील प्रचारांवर लक्ष :"समाज माध्यमांवरुन केल्या जाणाऱ्या प्रचारावर यंदा विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी विशेष कक्ष तयार केला," अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे. "जसा-जसा उमेदवारांकडून आणि पक्षांकडून खर्च केला जाईल तसा-तसा त्याचा लेखाजोखा ठेवला जाईल," असंही ते म्हणाले आहेत.
गत निवडणुकीत कोणी केला किती खर्च? :"गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डिजिटल माध्यमांच्या प्रचारासाठी अधिक वापर करण्यात आला होता. सर्व राजकीय पक्षांनी मिळून डिजिटल माध्यमावरील प्रचारासाठी सुमारे 53 कोटी रुपये खर्च केले होते. या आकडेवारीत भारतीय जनता पार्टीकडून सर्वाधिक सोशल मीडियावर खर्च केला गेला होता," अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
सोशल माध्यमांवर मिळाल्या इतक्या जाहिराती? :गत लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या सोशल मीडियावरुन कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती मिळाल्या होत्या. यामध्ये फेसबुकला एक कोटी एकवीस लाख रुपयांच्या छोट्या मोठ्या जाहिराती मिळाल्या. युट्युब आणि अन्य सोशल मीडियावरही सुमारे 15000 जाहिराती झळकल्या होत्या. या जाहिरातींसाठी राजकीय पक्षांनी तब्बल 27 कोटी 36 लाख रुपये मोजले होते.
काँग्रेस भाजपाने केला किती खर्च? :फेसबुकने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस पक्षाने फेसबुकला 3686 जाहिराती दिल्या होत्या. यासाठी त्यांनी एक कोटी 46 लाख रुपये खर्च केले. तर काँग्रेस सोबत असलेल्या घटक पक्षांनी या जाहिरातींवर सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले होते. सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियावर आणि फेसबुकवर सर्वात जास्त खर्च केला आहे. त्यांनी फेसबुकला अडीच हजार जाहिराती दिल्या होत्या. या जाहिरातींसाठी चार कोटी 23 लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियावर एकूण 25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.