मुंबई Lok Sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातच नाही, तर मुंबईतील दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईत ६ पैकी ६ जागा जिंकण्याचा दावा करणारे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मुंबईत जबरजस्त झटका बसला. मुंबईत महायुतीचा केवळ २ जागी विजय झाला. तर महाविकास आघाडीनं ४ जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या वरळी या विधानसभा मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ६४,८४४ मत मिळाली. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी आता दुसऱ्या मतदार संघाचा शोध सुरू केला. हिम्मत असेल तर या मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज केलं आहे. परंतु वास्तविक पाहता आदित्य ठाकरे यांनी या मतदार संघातून अरविंद सावंत यांना ६,७१५ मतांचा लीड दिला आहे. पण मुंबईत असे बरेच विधानसभा मतदार संघ आहेत, जिथं भाजपाचे आमदार आपल्या उमेदवाराचं मताधिक्य वाढवण्यात कमी पडले आहेत. मग त्यांचंही मतदारसंघ बदलले जातील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले आहेत नितेश राणे?नितेश राणे म्हणाले आहेत की, "आदित्य ठाकरे यांना जनतेने नाकारले आहे. वरळीमध्ये त्यांची हार होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी नवीन मतदार संघाचा शोध सुरू केला असून त्यांच्याकडं तीन पर्याय आहेत. एक अणुशक्ती नगर, दुसरा मुंबादेवी आणि तिसरा मुंब्रा. ज्या पद्धतीनं राहुल गांधी पराभूत झाल्यावर त्यांनी वायनाडचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या पद्धतीनं आता आदित्य ठाकरे मतदार संघाच्या शोधात आहेत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वरळी येथून निवडणूक लढवणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा आणि महायुतीवर टीका करण्यापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वरळीमधून निवडून आणावं, खरंच आदित्य बाळासाहेबांचा नातू असतील, तर त्यांनी माझं हे चॅलेंज स्वीकारावं," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
असे अनेक मतदार संघ: नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील मताधिक्यावरुन त्यांच्यावर टीका केली. पण मुंबईत असे अनेक मतदार संघ आहेत जिथं महायुतीच्या आमदारांना आपल्या विभागातील उमेदवाराला लीड देण्यात अपयश आलं आहे. अशा परिस्थितीत ते आमदार सुद्धा दुसऱ्या मतदार संघाच्या शोधात आहेत का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो.
मुंबईतील लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये विधानसभा निहाय मते
उत्तर-पश्चिम मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे विजय उमेदवार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना कमी मतदान झालं. जोगेश्वरी पूर्व मध्ये रवींद्र वायकर यांना ७२,११८ तर अमोल कीर्तिकर यांना ८३,४०९ मत मिळाली. तर गोरेगावमध्ये भाजपाच्या आमदार विद्या ठाकूर यांच्या मतदारसंघांमध्ये रवींद्र वायकर यांना ९४,३०४ मत मिळाली तर अमोल कीर्तीकर यांना ७०,५६२ मत मिळाली.
उत्तर पूर्व मुंबई:उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये घाटकोपर पश्चिम भाजपाच्या राम कदम यांच्या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना ७९,११७ मत मिळाली तर मिहीर कोटेचा यांना ६३,३७० मत मिळाली. त्याचप्रमाणे मानखुर्द शिवाजीनगर समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार असलेल्या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना सर्वाधिक १,१६,०७२ मत मिळाली, तर मिहीर कोटेचा यांना केवळ २८,१०१ मते मिळाली.