पुणे Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीबाबत निकाल लागणार आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया पाहिली तर अनेक मतदारसंघात कमी मतदान झालेलं पाहायला मिळालं. तर राज्यातील बहुतांश मतदारसंघात अनेक मतदारांचं मतदार यादीतून नावच गायब झाल्यानं मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. अशातच याबाबत सजग नागरिक मंचाच्या वतीनं माहिती अधिकारात माहिती घेतली असता 3 पद्धतीनुसार मतदारांची नाव वगळण्यात येत असते.
प्रत्येक निवडणुकीत नियमित मतदान करणाऱ्या मतदारांची नावं अचानक मतदान यादीतून गायब होण्याच्या हजारो घटना राज्यात घडल्यात. तर निवडणूक आयोग मतदारांनी याद्या चेक केल्या नाहीत असं म्हणून याची जबाबदारी झटकून मोकळे होते. म्हणून मतदार यादीतून एखाद्या मतदाराचं नाव कट करताना काय प्रक्रिया केली जाते याची माहिती अधिकारात निवडणूक आयोगाकडं मागितली असता याच्या उत्तरात निवडणूक आयोगानं तीन कारणं दिल्याचं, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितलं.
...यामुळं वगळली जातात मतदार यादीतून नावं : ते म्हणाले की, "दुसऱ्यांदा नावनोंदणी किंवा मतदारांचा पत्ता बदलणं किंवा मतदारांचा मृत्यू यापैकी कोणत्याही कारणानं मतदार यादीतून नाव वगळलं जाऊ शकतं. मात्र यापैकी कोणत्याही कारणानं नावं वगळताना फॉर्म 7 भरुन घेतलाच पाहिजे. मतदाराला नाव वगळण्यापूर्वी रजिस्टर पत्राने फॉर्मात-A प्रमाणे नोटीस दिलीच पाहिजे. या नोटीसनंतर यासंदर्भात आपलं म्हणणे मांडण्यासाठी मतदाराला 15 दिवसांची मुदत दिलीच पाहिजे. मतदारानं 15 दिवसांत प्रतिसाद दिला नाही, तर BLO ने मतदाराच्या पत्त्यावर स्वतः जाऊन खात्री करावी. त्यानंतरच BLO च्या रिपोर्टच्या आधारावर फाॅर्म 7 नसतानाही मतदाराचं नाव यादीतून वगळता येईल", अशी माहिती आयोगानं दिल्याचं वेलणकर म्हणाले.