महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिसऱया टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद; देशात सरासरी 61 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 7:14 AM IST

Updated : May 7, 2024, 10:29 PM IST

22:19 May 07

आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 Third Phase : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडलं. तिसऱ्या टप्प्यात एकूण सरासरी ६१.४५ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई Lok Sabha Election 2024 Third Phase :तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५४.७७ टक्के मतदानाची नोंद झाली.

कुठे किती टक्के झाले मतदान : बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के मतदान झालं. गुजरातमध्ये ५६.७६ टक्के, कर्नाटकमध्ये ६७.७६ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६३.०९ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झालं.

महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान :मंगळवारी सकाळी ७ वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती. तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९२ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. उन्हामुळं महाराष्ट्रात कमी मतदान झाल्याचं बोललं जातंय.

19:17 May 07

माढा लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून पेटवलं

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा क्षेत्रातील बागलवाडी येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया बंद पडली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना सांगोला तालुक्यातील हा प्रकार घडल्याने मतदानाला गालबोट लागल्याची चर्चा सांगोला तालुक्यामध्ये सुरू आहे.

एका मतदारानं दुपारच्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून ती मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. या तरुणानं 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देत पेट्रोल ओतल्याचेही बोलले जात आहे. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, या ठिकाणी तीन बॅलेट युनिट असून सर्व बॅलेट युनिट व्यवस्थित आहेत. कंट्रोल युनिटही व्यवस्थित आहे.

17:49 May 07

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर - ५५.३८ टक्के

सांगली - ५२.५६ टक्के

बारामती - ४५.६८ टक्के

हातकणंगले - ६२.१८ टक्के

कोल्हापूर - ६३.७१ टक्के

माढा - ५०.०० टक्के

उस्मानाबाद - ५२.७८ टक्के

रायगड - ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के

सातारा - ५४.११ टक्के

सोलापूर - ४९.१७ टक्के

17:25 May 07

रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएम मशीनची केली होती पूजा

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईव्हीएम मशीनची पूजा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

17:04 May 07

मतदान केंद्राजवळ एकाची हत्या

धाराशिव - धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. या घटनेमुळं मतदानाला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. ही घटना राजकीय वादातून झाली असल्याचं नागरिक बोलत असले तरी पोलीस मात्र याला वैयक्तीक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगत आहेत.

15:41 May 07

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर - ४४.४८ टक्के

सांगली - ४१.३० टक्के

बारामती - ३४.९६ टक्के

हातकणंगले - ४९.९४ टक्के

कोल्हापूर - ५१.५१ टक्के

माढा - ३९.११ टक्के

उस्मानाबाद - ४०.९२ टक्के

रायगड - ४१.४३ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के

सातारा - ४३.८३ टक्के

सोलापूर - ३९.५४ टक्के

15:28 May 07

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

कार्यकर्त्यांची उडाली तारांबळ

उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावरील घटना

मतदानासाठी गेलेले महादेव सुतार हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले

नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये केले दाखल

उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा झाला मृत्यू

13:41 May 07

महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

मतांची टक्केवारी

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. ही घटना हातकणंगले मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर घडली. बोगस मतदान प्रतिनिधींवर कारवाई करावी या कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक होऊन हा प्रकार हाणामारीपर्यंत गेला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

11:35 May 07

आमदार दत्ता भरणे यांची मतदाराला शिविगाळ, रोहित पवारांनी पोस्ट केला व्हिडिओ

पुणे Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी भेट दिली. दुसरीकडं रोहित पवार यांनी आमदार दत्ता भरणे यांचा मतदाराला शिविगाळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आमदार दत्ता भरणे उमेदवाराला शिविगाळ करत असल्याचं दिसत आहे.

10:33 May 07

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेनी केलं मतदान, मतदारांना केलं हे आवाहन

सातारा Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रात मतदान केलं. पत्नी वैशाली, मुले तेजस आणि साहिल शिंदे यांच्या समवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं, यावेळी पत्नी वैशाली यांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर कुटुंबासोबत त्यांनी मतदान केलं. "मी लोकशाहीच्या मंदिरात जावून मतदान केलं आहे. प्रत्येकानं आपला मतदानाचा अधिकार पार पाडून लोकशाही मजबूत करावी," असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.

09:43 May 07

बारामतीत 9 वाजेपर्यंत 5.77 टक्के मतदान : उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवारांनी केलं मतदान

पुणे Lok Sabha Election 2024 Voting : बारामती लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.77 टक्के मतदान झालं आहे. बारामतीत सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी सकाळीच मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, उपमुखमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मतदान केलं आहे.

08:54 May 07

साताऱ्यात बिग फाईट, महायुतीचे उमेदवार उदयन राजेंनी 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Lok Sabah Election 2024

सातारा Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. या लढतीकडं राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी देखील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावात मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी दिसत आहे. दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात 100 युनिक मतदान केंद्र बनवली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रांमध्ये मतदार मतदानानंतर सेल्फी घेत आहेत. साताऱ्यातील गोडोली उपनगरातील बांबूची सजावट करण्यात आलेलं मतदान केंद्र लक्ष्यवेधी ठरतंय.

08:43 May 07

माझा अडीच लाखांच्या लीडने विजय होईल-सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतदान केल्यानंतर विरोधकांवर आरोप केला. ते म्हणाले,"अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने जनता उभी असल्याने माझा अडीच लाखांच्या लीडने विजय होईल. काही गोष्टी विरोधकांकडून जाणूनबुजून केल्या जात आहेत. माझ्या उमेदवारीपासून खूप त्रास दिला जात आहे. आजही काही ठिकाणी बुलेट युनिट डाव्या बाजूला ठेवण्यात येत आहे. त्यामुळे माझे नाव लोकांनां दिसू नये हा हेतू आहे. मतदान केंद्राबाहेर नमुना लावताना सुद्धा जाणूनबुजून ईव्हीएम मशीनचा न लावता पोस्टल मतदानाचा नमुना लावण्यात आला आहे. प्रचार संपल्यानंतर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धमक्या दंडूकशाही पैशांचा अमाप वापर कार्यकर्त्यांना दमबाजी करत आहेत. यंत्रणेला हाताशी धरून प्रशासनाचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप बदनामी केली आहे. राजकारणातील पातळी विरोधकांनी खालावल्यामुळे माझा आता विजय निश्चित झाला आहे वसंतदादा घराण्याला संपवण्यासाठी एवढ्या वाईट पद्धतीची कूटनीती वापरतील, असे वाटले नव्हते, ही वेळ त्यांच्यावर आली आहे. तर विशाल पाटील यांच्याबाबतीत जे काय चुकीचं व्हायरल होत आहे. ते चुकीचं आहे जनता 4 जूनला दाखवेल," असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

07:45 May 07

लोकसभा निवडणूक 2024 : ही तर सुरुवात आहे, अजित पवार यांचा गर्भित इशारा

पुणे Lok Sabah Election 2024 : आपलाच उमेदवार निवडून येणार, असं सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटते. मात्र ही तर नुकतीच सुरुवात आहे, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. "ही निवडणूक देशाची आहे, त्यामुळे स्थिर सरकार देऊन मतदार संघाचा विकास कोण करू शकतो, याचा विचार मतदार करणार आहे. अद्याप सहा वाजणं बाकी आहे, सहा वाजतापर्यंत किती मतदान होते, हे पहावं लागेल. बारामती लोकसभा मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा आहे. त्यामुळे ही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक नाही. त्यामुळे आम्ही महायुतीचे सगळेच जणं सगळ्याच लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी काम करत आहोत."

07:35 May 07

सांगलीत मतदान प्रक्रिया सुरू, मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting : सांगली लोकसभा मतदार संघात आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सांगलीतील सर्वच मतदार संघावर मतदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात महायुतीकडून संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्यात लढत होत आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अगोदरचं जाहीर केल्यानं या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत चांगलंच नाराजीनाट्य घडलं होतं.

06:34 May 07

लोकसभा निवडणूक 2024 : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, उदयन राजे भोसलेंनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आज राज्यातील अनेक दिग्गजांचं भवितव्य पेटीत बंद होणार आहे. बारामतीत नणंद भावजयीमध्ये सरळ लढत होणार आहे. या लढतीकडं देशभराचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत बारामती लोकसभा मतदार संघाचं नेतृत्व केलं. मात्र राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजयी सुनेत्रा पवार यांनी तगडं आव्हान निर्माण केलं आहे. दुसरीकडं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात विनायक राऊत यांचा सामना होणार आहे. आज रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात लढती होणार आहेत.

बारामतीत नणंद भावजयी लढत :बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. या लढतीवरुन शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढतीवरुन काका की पुतण्या वरचढ ठरणार हे पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सध्या भावनिक राजकारण केलं जात आहे. त्यामुळे बारामती मतदार संघावरुन मोठं रणकंदन सुरू आहे.

Last Updated : May 7, 2024, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details