मुंबई Leptospirosis Infection In Mumbai :मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तर लगेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होते. मग चर्चा सुरू होते ती, यंत्रणा काय करतात? करोडो रुपये खर्च करून महापालिका सुविधा देऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न पालिका प्रशासनाला विचारले जातात. खेदाची बाब म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांच्या वाट्याला हे दुखणं येते. मात्र, लोकहो या साचलेल्या पाण्यातून नेहमीच वाट काढत जाताना आता तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी देखील घेणं तितकच गरजेचं आहे. कारण, याच साचलेल्या पाण्यातून साथीच्या रोगांचा प्रसार होतो. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस असून मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे या रोगाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
साचलेल्या पाण्यामुळे होते लेप्टोस्पायरोसिस :रस्त्यांवरील खड्डे, सखल भाग अशा ठिकाणी अनेकदा पाणी साचलेले दिसतं. आपण देखील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढं जातो. मात्र, याच साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचे विषाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी बाहेर पडताना आपली काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत लेप्टोस्पायरोसिस आजाराचे एक जुलै ते 15 जुलै या 15 दिवसात तब्बल 52 रुग्ण आढळले असून, 14,059 नागरिकांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सदृश्य लक्षणं आढळून आली आहेत.
लेप्टोस्पायरोसिस बाधित रुग्णांचा शोध :या संदर्भात पालिका प्रशासनाने म्हटले आहे की, "लेप्टोसाठी महापालिका विशेष काळजी घेत आहे. लेप्टोस्पायरोसिस बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवत आहोत. आतापर्यंत 6 लाख 89 हजार 433 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, 32 लाख 10 हजार 390 मुंबईकरांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 81,556 नागरिकांची ब्लड टेस्ट करण्यात आली," अशी माहिती पालिकेनं दिली आहे. यासोबतच यासाठी 124 आरोग्य शिबीर देखील घेण्यात आल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.
उंदीर आणि घुशीमुळे होतो लेप्टोस्पायरोसिस आजार :लेप्टोस्पायरोसिस या आजाराचं मुख्य कारण म्हणजे उंदीर आणि घुशी आहेत. त्यामुळे, लेप्टोस्पायरोसिसचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे. यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं 'मूषक संहार मोहीम'च हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 98 हजार 818 उंदीर मारल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. दिवसा उंदरांना मारणं फारसे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी मूषक संहार मोहीम राबवली जाते. पालिकेच्या कीटकनाशक विभागानं दिलेल्या माहितीनुसार, "जानेवारी 2024 ते 14 जुलै 2024 पर्यंत दोन लाख 39 हजार 527 उंदीर मारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून, पिंजरे लावून उंदीर, घुशी मारले जातात. सध्या एक उंदीर मारण्यासाठी पालिकेकडून 20 ते 25 रुपयांचा खर्च केला जात आहे.
दूषित पाण्यानं पसरतो लेप्टोस्पायरोसिस आजार :लेप्टोस्पायरोसिस हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यानं पसरतो. लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू हे दूषित पाण्यात आढळतात. ते आपलं कान, नाक किंवा आपल्या शरीरावर एखादी जखम झाली असेल तर त्या वाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे तुमच्या पायाला जखम झाल्यास किंवा शरीरावर एखादा फोड असल्यास आणि तो फुटल्यास पावसाळ्यात बाहेर पडताना गम बूट घालावेत. जखमेला झाकून घ्यावे, अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.
मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन :या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागानं देखील मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. महापालिका प्रशासनानं म्हटलं आहे की, "या आजाराची लागण झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात अतिशय सामान्य लक्षणं दिसतात. या आजाराच्या प्रमुख लक्षणांबद्दल बोलायचं झाले तर डोळ्यांना खाज सुटणं, लघवीला त्रास होणं, उलट्या आणि जुलाब, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, ताप येणं, डोकंदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. यानंतर साधारण तीन किंवा सहा दिवसांनी या आजाराची गंभीर लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. यात खोकताना रक्त येणं, लघवी कमी होणं, छातीत दुखायला लागणं, अशी लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला या ही लक्षणं दिसणारी एखादी व्यक्ती असेल तर त्याला ताबडतोब नजीकच्या पालिका रुग्णालयात दाखल करावं," असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
हेही वाचा :
- Leptospirosis infection : मुंबईत लेप्टोच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू, जाणून घ्या कसा संसर्ग टाळावा
- पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय
- Scrub Typhus Odisha : ओडिशामध्ये स्क्रब टायफस रोगानं घेतला ५ जणांचा बळी, सरकार अलर्ट मोडवर