लातूरNEET Paper Leak Case : वैद्यकीय शिक्षण परीक्षा (नीट) घोटाळ्याचे लातूर कनेक्शन उघड झाल्यानंतर दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नीट घोटाळ्यामध्ये भारत सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर (NTA) लातूरच्या सचिन बांगड आणि योगेश गुट्टे या 'नीट' परीक्षेतील तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
नीट परीक्षेतील घोटाळ्याविषयी शंका उपस्थित करताना नीट परीक्षा तज्ञ (ETV Bharat Reporter) आधी कमी मार्क्स पडलेल्यांना दुसऱ्यांदा लक्षणीय मार्क्स :नीट परीक्षेतील बरेच विद्यार्थी सिलेक्शन यादीमध्ये आहेत; परंतु त्यांनी महाराष्ट्रातून नीट परीक्षा दिलेली नाही. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्रातून नीट परीक्षा दिली तेव्हा, त्यांना कमी मार्क होते. मात्र त्याच विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यातून परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या मार्कांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आढळली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नीट परीक्षेचे सेंटर असताना विद्यार्थी आपल्या राज्यातून हजारो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा का देत आहेत? ही शंका उपस्थित झाल्यानंतर लातूरच्या सचिन बांगड आणि योगेश गुट्टे यांनी NTA ला पत्रव्यवहार करुन विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे सेंटर देण्याऐवजी त्यांनी दहावी-बारावी कुठून केली आहे? त्यांचे आधार कागदपत्रं कुठले आहेत? यावरुन त्यांना परीक्षा केंद्र देण्यात यावं, अशी मागणी केली होती. शिवाय स्व जिल्ह्यातील सेंटर विद्यार्थ्यांना सोयीचे होईल आणि पर्यायानं नीट संदर्भातल्या अनेक शंका दूर होतील, असं पत्राद्वारे सांगितलं होतं. पण NTA नं लातूरच्या सचिन बांगड आणि योगेश गुट्टे यांच्या पत्राला कोणताच प्रतिसाद दिलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रॅकेट चालवणाऱ्यांसाठी पळवाटा :सचिन बांगड म्हणाले की, "नीट घोटाळ्यात NTA प्रत्यक्ष सहभागी दिसत नसले, तरी NTA ने नीट घोटाळ्याचे रॅकेट चालवणाऱ्यांना अनेक पळवाटा स्वतः उपलब्ध करुन दिल्या आहेत."
1) परीक्षा केंद्र निवडण्याची सवलत विद्यार्थ्यांना दिलीय. यामध्ये जेथील पत्ता टाकाल तिथलं तुम्हाला परीक्षा केंद्र मिळेल. म्हणजे महाराष्ट्रातील परीक्षार्थीनं बिहार मधला जरी पत्ता दिला, तर त्याला बिहारमध्येच केंद्र मिळणार. त्याची तपासणी NTA करत नसून मागेल तिथं परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देते.
2) परीक्षा केंद्रावरचं व्यवस्थापन परीक्षा केंद्राच्या प्रमुखाकडं देण्यात आले आहे. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये नीट परीक्षेचे केंद्र असेल तर त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य हे त्या परीक्षा केंद्राचे प्रमुख असतात. परीक्षेवेळी कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हे सर्व केंद्र प्रमुखच ठरवतात. त्यामुळे त्या परीक्षा केंद्रावर हव्या त्या गोष्टी केंद्रप्रमुखाला करता येऊ शकतात.
विद्यार्थ्यांची माहिती दलालांना मिळते तरी कशी? :नीट घोटाळ्याचं रॅकेट चालवणारे लोक अशाच पद्धतीनं सेंटर मॅनेज केल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे नीट घोटाळ्यात NTA अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा संशय लातूरच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील दोन-तीन वर्षांमध्ये असंख्य पालक, विद्यार्थ्यांनी लातूरच्या तज्ज्ञांना संपर्क करुन सांगितलं की, "त्यांना कोणीतरी फोन करुन आम्ही 'नीट'ची परीक्षा मॅनेज करुन देतो. तुम्हाला फक्त आम्ही म्हणतो ते परीक्षा केंद्र घ्यावे लागेल. तुमचा परीक्षा फॉर्म पण आम्हीच भरतो. नीट परीक्षेचे पूर्ण नियोजन आम्ही करतो, असे सांगणारे फोन आले असून असं खरंच घडू शकतं का?," असं अनेक पालक, विद्यार्थ्यांनी नीट तज्ज्ञ योगेश गुट्टे यांना विचारलं आहे. यावरुन असं लक्षात आलं की, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती रॅकेट चालवणाऱ्या दलालांना कोणीतरी पुरवत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले आहेत, त्यांची माहिती परीक्षा होण्यापूर्वीच दलालांना मिळत आहे. परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ही NTA कडं असते. नीट परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया NTA कडून राबवली जाते.
श्रीमंत विद्यार्थी रॅकेटच्या जाळ्यात :'नीट' परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे पालक या रॅकेटला बळी पडत आहेत. त्यामुळे नीट परीक्षा मॅनेज होऊ शकते का? यावर लातूरच्या या दोन तज्ञांनी मागील दोन-तीन वर्षांत अनेक पालकांना नकार दिला होता. पण आता देशभर नीट परीक्षेचा घोटाळा उघड झाल्यानंतर नीट परीक्षा मॅनेज होऊ शकतं हे उघड झालं आहे. "देशपातळीवर नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असून यामध्ये NTAचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे," अशी शंका 'नीट' तज्ज्ञ योगेश गुटे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
- एकाच कुटुंबातील 5 जण भुशी धरणात गेले वाहून, बचावकार्य सुरू - 5 people washed in Bhushi Dam
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्याकडं प्रस्थान; राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती - Ashadhi Wari 2024
- मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या; पोलीस घेताहेत मारेकऱ्यांचा शोध - Bapu Andhale Murder Case