कोलकाता : कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर माथेफिरूनं बलात्कार करुन तिचा खून केल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी संजय रॉय याला न्यायालयानं शनिवारी दोषी घोषित केलं. न्यायालयानं आज संजय रॉय याला शिक्षा ठोठावली आहे. संजय रॉय याला न्यायालयानं जन्मठेप ठोठावली आहे. शिक्षा ठोठावताना न्यायालयानं संजय रॉय याला त्याची इच्छा विचारली असता, त्यानं आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
संजय रॉय याला जन्मठेप :कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर माथेफिरू संजय राय यानंच बलात्कार केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. न्यायालयानं संजय रॉय याला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याबाबत माहिती देताना वकील रहमान यांनी सांगितलं की, "सियालदाह इथल्या सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशांनी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले. सीबीआयनं या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र न्यायाधीशांनी हे दुर्मिळ प्रकरण नाही, म्हणून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही," असं स्पष्ट केलं.