मुंबई Keshav Upadhye On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नकली शिवसेना असं, संबोधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याचा समाचार घेतला. बाहेरच्या माणसांनी येऊन सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे यांना शिंदे यांचीच शिवसेना न्यायालयानं प्रमाणित केलेली खरी शिवसेना असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर इथं झालेल्या सभेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे. शिंदे यांची शिवसेना खरी असून जनता शिंदे यांच्या सेनेच्या पाठीशी राहील," असं पंतप्रधान या सभेदरम्यान बोलले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करून त्यांची वृत्ती दाखवून दिली. यापुढे आम्ही त्यांना निश्चितच उत्तर देऊ, कारण आमचे उत्तर हे पंतप्रधानांना नसेल तर एका पक्षाच्या नेत्याला असेल. आमची शिवसेना असली आहे, की नकली हे राज्याबाहेरील व्यक्तीनं येऊन सांगण्याची गरज नाही. ते राज्यातील जनतेला निश्चितच माहीत आहे," असा टोला ठाकरे यांनी लगावला. तर "भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी, भेकड जनता पार्टी आणि भाकड जनता पार्टी," अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपावर टीकेचा प्रहार केला.