नाशिक kavita Raut On Government : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारच्या सेवेत नोकरी मिळावी म्हणून गेल्या दहा वर्षांपासून संघर्ष करत आहेत. राज्य शासनानं 12 सप्टेंबर 2024 रोजी शासन आदेश काढला त्यात कविता राऊत यांची नेमणूक क्रीडा मार्गदर्शक (Sports Guide) म्हणून केली. त्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कविता राऊत या सध्या देहराडून ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे.
प्रतिक्रिया देताना माजी धावपटू कविता राऊत (ETV BHARAT Reporter) राज्य सरकारनं क्रीडा मार्गदर्शक म्हणून नेमणूक करत माझ्या तोंडाला पानं पुसली आहेत. गेल्या दहा वर्षापासून मी नोकरीसाठी संघर्ष करत आहे. त्याचं फळ अशा प्रकारे मिळत असेल तर मी क्रीडा मार्गदर्शक पदाचा पदभार स्वीकारणार नाही. त्याचबरोबर सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. -कविता राऊत, माजी धावपटू
मी 'ही' परीक्षा देऊ शकत नाही : कविता राऊत म्हणाल्या, "मला क्रीडा विभागात क्रीडा मार्गदर्शक पद आणि क्लास वन अधिकारी पदाचे वेतन देण्याबाबत निर्णय झाला. गेल्या काही वर्षात माझ्या बरोबरचे सर्व खेळाडू डीवायएसपी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. मी आज क्रीडा मार्गदर्शक म्हणून पदभार स्वीकारला तर निवृत्त होताना तालुका क्रीडा अधिकारी म्हणून देखील निवृत्त होणार नाही. या पदावर कार्यरत असतानाच पाच वर्षाच्या आत एनआयएसची परीक्षा द्यावी लागते. आता पूर्वी इतका सराव राहिला नाही. त्यामुळं मी ही परीक्षा देऊ शकत नाही".
माझ्यासाठी वेगळा न्याय का : माझ्याबरोबर असलेले वीर धवल खाडे, राही सरनोबत उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचं देखील ग्रॅज्युएशन नव्हतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला. आज माझ्याबरोबर कार्यरत असलेली ललिता बाबर उपजिल्हाधिकारी आहेत. त्याचबरोबर माझ्यानंतर आलेली ललिता माने जिल्हा क्रीडा अधिकारी आहे. मग मलाच का वेगळा न्याय? मध्यंतरी आदिवासी विभागात 'क' वर्ग कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा करण्यात आल्याची महिती, कविता राऊत यांनी दिली.
मी पदभार स्वीकारणार नाही :सरकारनं नवीन जीआरनुसार ही नियुक्ती केली आहे. मला मागील जीआरनुसार नोकरी मिळावी ही मागणी आजही कायम आहे. यापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्री, क्रीडा विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवून झाले आहेत. आता पर्याय नसल्यानं मी न्यायालयात जाणार आहे. मी क्रीडा मार्गदर्शक पदाची नोकरी स्वीकारणार नाही, असं कविता राऊत यांनी म्हटलं.
कविता राऊत यांची कामगिरी : 2009 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5000 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकलं. तसंच चीनमधील ग्वांगझू येथे 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये रौप्य पदक, 2010 आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये रौप्य पदक, 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 10,000 मीटरमध्ये कांस्यपदक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलेचे पहिले वैयक्तिक ट्रॅक पदक, महिला मॅरेथॉनमध्ये 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र, 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा शिव छत्रपती पुरस्कार ही कविता राऊत यांना प्राप्त झाला आहे.
हेही वाचा -
- दहा वर्षापासून नोकरीसाठी झिजवले मंत्रालयाचे दरवाजे, तरी निराशा; 'सावरपाडा एक्सप्रेस' कविता राऊतचा सरकारवर 'हा' गंभीर आरोप
- ऑलिम्पियन कविता राऊतसह अनेक खेळाडूंचा पदकं परत करण्याचा राज्य सरकारला इशारा, बेमुदत उपोषणही करणार, कारण काय?