पुणे Leopard Escapes From Pune Zoo : कर्नाटकवरुन आणलेला बिबट्या पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून पळाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून नर बिबट्या सोमवारी पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी प्रशासनाकडू मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू होती. अग्निशामक दलाकडून अतिरिक्त 3 वाहनं आणि पीएमआरडीएचे अग्निशमन वाहन ही दाखल झालं होते. जवळपास 12 तासहून अधिक काळापासून प्रशासनाच्या मदतीनं शोधकार्य सुरू होतं. या बिबट्याला थर्मल ड्रोननं शोधण्यात येत असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं दिली होती. अखेर मंगळवारी रात्री अशिरा या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय.
हंप्पीतील प्राणी संग्रहालयातून आणला होता बिबट्या :कात्रज इथं पुणे महापालिकेचं प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात काही दिवसांपूर्वी हंप्पी इथल्या अटलबिहारी वाजपेयी प्राणी संग्रहालयातून तरस, चौसिंगे आणि बिबट्याला आणण्यात आलं होतं. या बिबट्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी त्यानं विलगीकरण कक्षातून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली.