मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि कुरबुरींना वेग आलाय. विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्षाची पुढील वाटचाल ठरवण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक घेण्यात आलीय. मात्र या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विषयीची नाराजी मोठ्या प्रमाणात बाहेर आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी थेट एका कार्यकर्त्याने भर बैठकीत केल्यानं खळबळ उडालीय. जयंत पाटील यांनीदेखील या आरोपांना उत्तर देताना आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना फैलावर घेत तुम्ही बुथ लेव्हलला काय काम केलंय, दोन दिवसांत त्याचा अहवाल द्या, मी आठ दिवसांत राजीनामा देतो, असंही सांगितलंय.
जयंत पाटील यांच्या विषयी नाराजी : जयंत पाटील यांच्या विषयीची नाराजी इतक्या मोठ्या प्रमाणात का उफाळून आली, याबाबतच्या उलटसुलट चर्चांना आता सुरुवात झालीय. खरं तर अजित पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिलेत. विशेष म्हणजे जयंत पाटलांकडे प्रदेशाध्यक्षपद असले तरी ते कधीही भाजपामध्ये प्रवेश करतील, असा संशय नेहमीच त्यांच्याबाबत व्यक्त केला गेलाय. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट भाजपासोबत गेला आणि सत्तेत सहभागी झाला. तेव्हादेखील जयंत पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती.
निवडणुकीतील कामगिरीमुळे मागणी? : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सत्तेत येण्याचा विश्वास बाळगलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य आलंय. जयंत पाटलांनी जिंकून येण्याची उमेदवारांची क्षमता लक्षात न घेता काही ठिकाणी उमेदवारी दिल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्या नाराजीतूनच जयंत पाटलांना हटवण्याची मागणी भर बैठकीत कार्यकर्त्यांनी केल्याचं बोललं जातंय.
जयंत पाटलांसाठी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त? :विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हादेखील जयंत पाटलांबाबत संशय व्यक्त केला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरींनी तर मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवल्याचा दावासुद्धा केला होता.
पवारांसोबतच असल्याचा पाटलांचा वेळोवेळी खुलासा : जयंत पाटलांनीदेखील वेळोवेळी यासंदर्भात खुलासे करून आपण शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी यापूर्वी जाहीर केलंय. मिटकरी यांच्या दाव्यावर पाटील यांनी मिटकरींवर टीका करत त्यांचे दावे फेटाळून लावलेत. मात्र, तरीही त्यांच्याबाबतचा संशय कमी झालेला नाही.
पाटलांची धोरणी नेते अशी ओळख : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्यासमोर काय पर्याय असतील, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. भर बैठकीत सर्वांसमोर थेट राजीनाम्याची मागणी झाल्याने पाटील कमालीचे दुखावले गेलेत. मात्र, पाटील हे अत्यंत धोरणी नेते आहेत. त्यामुळे ते भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेण्याची अजिबात शक्यता नाही. उलट ते धोरणीपणे आणि मुत्सद्दीपणाने पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत जाऊन मंत्रिमंडळात सामील होण्याचा पर्याय निश्चितच त्यांच्यासमोर आहे, मात्र पाटील नक्की काय निर्णय घेतील हे सद्यस्थितीत छातीठोकपणे सांगता येणं कठीण आहे.
रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची मागणी :कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि दिवंगत आर. आर. पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटील हे पक्षाचे वरिष्ठ नेते असून, त्यांना बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा केलाय. जयंत पाटलांना बाजूला करावं असं कोणी मला सांगितलेलं नाही, माझी भूमिकादेखील जयंत पाटलांना बदलावे अशी नाही आणि अशी मागणी मी कधी केलेली नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.
जयंत पाटील यांच्यामध्ये परिपक्वता : जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार अशी कोणतीही लढाई राष्ट्रवादीत नसल्याचा दावा त्यांनी केलाय. जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत. रोहित पवार तेवढे समजूतदार आहेत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये परिपक्वता आहे, असे आव्हाड म्हणालेत. निवडणुकीतील यश-अपयशावरून अध्यक्षपद काढत नाहीत, जयंत पाटील यांनी निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली. पुष्कळ वेळ दिला, अशा शब्दांत आव्हाडांनी पाटील यांचे कौतुक केलंय. लोकसभेतील यश हे जयंत पाटलांचं यश आहे, मग सहा महिन्यांत गणित बदलले तर जयंत पाटलांना काढून टाकावे, हे कुठले गणित आहे, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'आप'लेपणावरून काँग्रेसमध्ये नाराजी; संजय राऊत म्हणाले, "मी सहमत"!
- अमित शाहांना खूश करण्यासाठी खासदार फोडाफोडी; आरएसएसचं बुथ मॅनेजमेंट घोटाळ्याचं, संजय राऊतांचा हल्लाबोल