Nashik Income Tax Raid:नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकून सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड तसेच 90 कोटींचे बेहिशोबी मालमत्तेचे दस्तवेज जप्त केलाय. आयकर चुकवल्याच्या संशयावरून 23 मे रोजी सायंकाळी सहाला पथकानं अचानक सुराणा ज्वेलर्सच्या विविध ठिकाणी छापे टाकले. अचानक झालेल्या छापेमारीमुळं करबुडव्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे. नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. सराफा व्यावसायिकांवर पडलेल्या धाडीमुळं खळबळ उडालीय.
आयकर विभागाच्या छाप्याचं असं राहिलं स्वरुप (Source- ETV Bharat) फर्निचरमध्ये सापडल्या नोटा :आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 30 तासांपासून तपासणी सुरू आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरू होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केलीय. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या. आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निग्रणीखाली नाशिक,नागपूर, जळगावच्या पथकानं नाशिकमध्येही कारवाई केलीय. तब्बल 50 ते 55 अधिकाऱ्यांनी अचानक 23 मे रोजी गुरुवारी सायंकाळी छापे टाकले. तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खाजगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्स तपासण्यात आलं. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी सुरू आहे.
बेहिशेबी रोकडसह मालमत्तेचे दस्तावेज जप्त :छापेमारीत सापडलेली रोकड सात कारमधून मोजणीसाठी सीबीएस जवळच्या स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली. मात्र शनिवारी स्टेट बँकेला सुट्टी होती. परंतु बँकेच्या मुख्यालयात या दिवशीही रोकड मोजण्यात कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. सकाळी सातपासून रोकड मोजण्यास सुरुवात झाली. संपूर्ण रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तासांचा कालावधी लागला. शनिवारी रात्री बारा वाजता नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोकड ताब्यात घेतली. आयकर विभागाच्या छाप्यात सुरुवातीला कार्यालयांमध्ये तसेच खाजगी लॉकर्समध्ये कमी प्रमाणात रोकड हाती लागली. मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर फोडून बघितलं. फर्निचर फोडल्यावर मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. नाशिक शहरातील सराफा व्यावसायिकांवर पडलेल्या धाडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा