मुंबई :नौदलाच्या पश्चिम विभागाच्या ताफ्यात लवकरच तीन 'युध्दनौका' आणि एक 'पाणबुडी' सामील होणार असून त्यापैकी 'तुशील' ही युध्दनौका महिनाभरात येणार असल्याची घोषणा नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय जे सिंग यांनी दिली.नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय नौदलाच्या स्टील्थ गाइडेड मिसाइल विध्वंसक आय.एन.एस.मोर्मुगाओवर ही पत्रकार परिषद पार पडली.
महिनाभरात तीन युध्दनौका नौदलात सहभागी होणार : "तुशील ही युध्दनौका रशियात तयार केली जात असून महिनाभरात तीन नौदलात सहभागी होणार आहे. नौदलाच्या पश्चिम विभागात 'तुशील', 'निलगिरी', 'सुरत' या युध्दनौका आणि 'वाग्शीर' ही पाणबुडी लवकरच सहभागी होणार आहे. त्यापैकी तुशील वगळता इतर दोन्ही युध्दनौका आणि पाणबुडी निर्मितीचं काम माझ गाव डॉकमध्ये केलं जात आहे. भारतीय नौदल कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचा निर्धार संजय सिंग व्यक्त केला.
आव्हानासाठी सज्ज : "मेरीटाईम सुरक्षेवर आमचं बारीक लक्ष आहे. तर मेरीटाईम सुरक्षा ही केवळ आमच्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी महत्त्वाची आहे. शेजारील राष्ट्राच्या विविध घटनांच्या घडामोडींवर, सज्जतेवर आमचं लक्ष आहे. त्याचा आपल्यावर काय प्रभाव होईल याची आम्ही नेहमी काळजी घेत असतो. शेजारी राष्ट्रांच्या घडामोडीवर लक्ष असून नौदल कोणत्याही आव्हानासाठी सज्ज असल्याचं अॅडमिरल संजय सिंग यांनी सांगितलं."
भारतीय नौदल अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज: "गत वर्षात पायरसीच्या सुमारे २० घटना घडल्या, त्यामध्ये आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यापैकी ८ घटनांमध्ये गुंतलेल्यांना आम्ही भारतात आणून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली. भारतीय नौदलाच्या योग्य कारवाईमुळं आणि हस्तक्षेपामुळं अशा प्रकारांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. भारतीय नौदल अत्याधुनिक यंत्रणा ही अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ती सज्ज असल्याचं सिंग यांनी सांगितलं."
तैनातीबाबत दिली माहिती: सागरी सुरक्षा राखण्यासाठी आणि सुनिश्चित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे तैनात करण्यात आलेली जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या विस्तृत तैनातीबाबत त्यांनी माहिती दिली. ओप संकल्प, मिशन-आधारित तैनाती, परदेशी नौदलांसोबतचे सराव, सुरक्षा, मानवतावादी मदत, अंमली पदार्थ विरोधी आणि मादक द्रव्य विरोधी मोहिम यासह पश्चिम नौदल कमांडने गेल्या वर्षभरात मिळवलेल्या उपक्रमांबाबत सिंग यांनी माहिती दिली.
नौदलाची क्षमता वाढवण्यावर लक्ष: सध्या असलेली नौदलाची क्षमता वाढवण्यावर आमचं सातत्यानं लक्ष आहे. किनारपट्टी संरक्षण, सागरी सुरक्षा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करण्यासाठी एसओपी, समुद्रातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी, स्वदेशी युद्धनौकांची निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, सायबर सुरक्षा यावर त्यांनी प्रकाश टाकला. आयएनएस ब्रम्हपुत्रा पुन्हा सेवेत येणार आहे. दुरुस्तीदरम्यान जुलै महिन्यात ब्रम्हपुत्राला आग लागून नुकसान झाले होते अशी माहिती अॅडमिरल संजय सिंग यांनी दिली. यावेळी व्हाईस अॅडमिरल राजाराम स्वामीनाथन, व्हाईस अॅडमिरल अजय कोचर, रिअर अॅडमिरल अंकुर शर्मा, रिअर अॅडमिरल राहुल गोखले, रिअर अॅडमिरल अनिल जग्गी, रिअर अॅडमिरल विद्याधर हरके उपस्थित होते.
हेही वाचा -
- बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज INS अरिघात नौदलात दाखल - INS Arighat Submarine
- किम जोंग यांनी वाढविला तणाव! दक्षिण कोरियानं डिवचल्यानंतर घेतली क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी
- Submarine Vagir : भारतीय नौदलाला मिळेल बळकटी ; पाणबुडी 'वगीर' 23 जानेवारीला होणार ताफ्यात दाखल!