अहमदनगरindependence day 2024 : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी के मोरे जनता विद्यालयातील 1350 विद्यार्थ्यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी मानवी साखळी तयार केली. याद्वारे त्यांनी सर्वधर्मसमभावाची प्रतिकृती साकारत अनोख्या पद्धतीनं 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय.
सर्वधर्मसमभाव नांदावा हाच उद्देश :स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन, या निमित्तानं डी के मोरे जनता विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विद्यालयात विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत," अशी आपण प्रतिज्ञा म्हणतो. याचा अर्थ भारतात सर्वधर्मसमभाव नांदावा हाच उद्देश आहे. भारताच्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभावांचा आवर्जून उल्लेख केला आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या मनात इतरांच्या जाती-धर्माबद्दल आदरभाव निर्माण व्हावा, या उद्देशानं 1350 विद्यार्थ्यांची बैठक ही सर्वधर्मसमभाव या रचनेत करण्यात आली. विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या संकल्पनेतून ही रचना करण्यात आली. सामाजिक एकता आणि सहिष्णुता निर्माण व्हावी, एवढीच माफक अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
- तिरंगा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी :अहमदनगर जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा आणि निळवंडे धरणावर स्वातंत्र्य दिन निमित्तानं तिरंग्याची विद्युत रोषणाईतून प्रतिकृती उभारण्यात आली. हा तिरंगा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची शाखासुद्धा मागे राहिलेली नाही. भंडारदरा धरण शाखेनं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा धरणाच्या भिंतीवर रंगीत लाईट सोडून तिरंग्याची साक्षात प्रतिकृती सादर केली. अंधारामध्ये भंडारदरा धरणाने तिरंगा परिधान केला असल्याचं जाणवत असून तिरंग्याची ही प्रतिकृती पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षीही भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडलं जात असताना पाण्यामधून तिरंग्याची प्रतिकृती धरणशाखेने तयार केली होती.