नवी दिल्ली IT Tribunal On Congress : आयकर अपील न्यायाधिकरणाकडून काँग्रेस पक्षानं दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेत कॉंग्रेसनं, आयकर विभागानं वसुली आणि बँक खाती गोठवण्याच्या कारवाईवर स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, आयकर विभागानं काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली होती. तसंच प्राप्तिकर विभागानं 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. याचा अर्थ काँग्रेसला ही रक्कम आयकर विभागाला दंड म्हणून भरावी लागणार आहे.
काय होती काँग्रेसची मागणी? :काँग्रेसतर्फेज्येष्ठ वकील विवेक तंखा यांनी याचिका मांडली. याचिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला उच्च न्यायालयात जाण्यासाठीचा आदेश 10 दिवसांसाठी स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आमच्यासमोर तशी तरतूद नसल्याचं सांगत खंडपीठानं ही याचिका फेटाळली. तंखा यांनी युक्तिवाद केला की, राजकीय पक्ष निधीसाठी मर्यादित आहेत. कारण, त्यांना निवडणुकीसाठी निधीची आवश्यकता आहे. तसंच आगामी निवडणुकीत पक्षानं केवळ 350 जागा लढवल्या तरी प्रत्येक उमेदवाराच्या 50 टक्के खर्चाचा भार त्यांना उचलावा लागू शकतो, ही बाब महागात पडू शकते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार लोकसभा निवडणुकीत उमेदवार 95 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो, असंही ते म्हणाले.