बीड- संतोष देशमुख यांच्या हत्येतील ( Santosh Deshmukh murder case) कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. तर वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा. 'मकोका' लागू करावा, याकरिता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याच जाहीर केलं आहे.
संतोष देशमुख प्रकरणातील तपासाची माहिती दिली जात नसल्याचा दावा त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला. ते माध्यमांशी रविवारी बोलताना म्हणाले,"या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कमवत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीश मानेशिंदे यांनी हा खटला न्यायालयात लढवावा. जर ही मागणी मान्य होत नसेल तर 13 जानेवारी रोजी मस्साजोग येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन आहे. जोपर्यंत हा आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही". पुढे धनंजय देशमुख म्हणाले, " या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जर जामीन मिळाला तर त्याच्या हातून हाल होऊन मेल्यानंतर कुटुंबीयांना न्याय कोण देणार? मी मोबाईल टॉवरवरून उडी मारून स्वतःला संपवणार आहे," असा प्रशासनाला धमकीवजा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला.
ग्रामस्थांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा- मस्साजोग येथील नागरिकांनी हनुमान मंदिरात बैठक घेवून निर्णय घेत तहसीलदारांना एक निवेदन दिलं. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलं की, 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेला 34 दिवस झालेले आहेत. तरीही यातील एक आरोपी अटक झालेला नाही. तसेच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीवपूर्वक नोंद केलेला नाही. त्याच्यावर 'मकोका' लावण्यात आलेला नाही. तसेच सीआयडीचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि सर्व गावकरी हे १४ जानेवारी रोजी महादेव मंदिर या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
- यापूर्वीदेखील मस्साजोग येथील ग्रामस्थांनी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी करत जलसमाधी आंदोलन केलं होतं. पोलिसांसह प्रशासनानं कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं.
हेही वाचा-