नांदेडIncome Tax Department Raid in Nanded : नांदेडमध्ये आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. भंडारी बंधूंवर कारवाई केल्यानं आयकर विभागाला मोठं घबाड सापडलंय. या कारवाईत आयकर विभागानं जवळपास 14 कोटींची रोकड तसंच 8 किलो सोन्यासह सुमारे 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा, सोनं सापडल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
170 कोटींचं घबाड जप्त : नांदेडमधील भंडारी बंधूंच्या कार्यालयासह घरावर आयकर विभागानं शुक्रवारी छापे टाकले. यामध्ये एकूण 170 कोटींचा बेहिशेबी व्यवहार आढळून आलाय. यात 170 कोटी रुपयांपैकी 8 किलो सोनं, 14 कोटी रुपये रोख, उर्वरित रकमेच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच नाशिक आयकर विभागानं नांदेडमध्ये ही कारवाई केली.
रोकड मोजण्यास लागले 14 तास : या कारवाईत तब्बल 14 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना 14 तास लागले. ही रोकड सकाळी दहा ते मध्यरात्रीपर्यंत मोजण्यात आली. हा छापा दोन दिवस सुरू होता. त्यावेळी फक्त काही कागदपत्रं आयकर विभागाच्या हाती लागली होती. मात्र, व्यावसायिकाच्या भावाच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी घर बाहेरून खूप जुनं वाटत होतं. मात्र, त्या घरात अत्यंत महागड्या वस्तू होत्या. फर्निचरही महाग होतं. येथील एका कारच्या डिकीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड लपवण्यात आली होती.
सोने, चांदी, रोकड जप्त :आयकर विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून भंडारींच्या फायनान्सच्या कारभारावर पाळत ठेवली जात होती. त्यानंतर शुक्रवारी आयकर विभागानं भंडारीविरोधात थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत प्राप्तीकर विभागाला काही महत्त्वाचे दस्तावेज मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. 72 तासांपेक्षा अधिक काळ ही कारवाई चालू होती. आता प्राप्तीकर विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
25 गाड्या 60 पेक्षा अधिक अधिकारी :मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर विभागानं शुक्रवारी शहरातील शिवाजीनगर परिसरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये संजय भंडारी यांच्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय, निवासस्थानावर देखील छापेमारी करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी 25 वाहनात साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी आले होते. या पथकात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी इत्यादी शहरातील प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
हे वाचलंत का :
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्योगपती आनंद महिंद्रांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी . . . - Ghatkopar Hoarding Collapse
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : पोलीस कल्याण निधीच्या वादात निष्पापांचे बळी ? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Ghatkopar Hoarding Collapse
- मुंबईत वादळी वाऱ्यामुळं दोन दुर्घटना; पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली तर सुमारे 35 जण जखमी - Heavy Rain in Mumabi