मुंबई - राज्यातील विधानसभा लढतीचे चित्र स्पष्ट झालं असून, राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 4,140 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील 36 जागांसाठी 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांसाठी ही एक कसोटी आहे. काही मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय असा थेट सामना होणार आहे.
उत्तर भारतीय नेतेही प्रचाराला: 20 नोव्हेंबरला होणाऱ्या 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून, राज्यात एकूण 288 मतदारसंघांत 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांत 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी उत्तर भारतीय नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. उत्तर भारतीय उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा प्रचार सभा घेणार आहेत. महायुतीकडून भाजपाने गोरेगावमधून विद्या ठाकूर, बोरीवलीमधून संजय उपाध्याय, कलिनामधून रामदास आठवले गटाकडून अमरजीत सिंह तर एकनाथ शिंदे गटाकडून दिंडोशीमध्ये संजय निरुपम, अजित पवार गटाकडून मुस्लिम उत्तर भारतीयांना मानखुर्द - शिवाजीनगरमधून तिकीट देण्यात आलंय, तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला अणुशक्तीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्याचबरोबर वांद्रे पूर्व येथून झिशान सिद्दिकी यालाही तिकीट देण्यात आलंय.
उत्तर भारतीय उमेदवारांमध्ये थेट लढत : काँग्रेसने चांदिवलीमधून नसीम खान, मालाडमधून अस्लम शेख, चारकोपमधून यशवंत सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अणुशक्ती नगरमधून फहाद अहमद याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. समाजवादी पक्षाकडून मानखुर्द-शिवाजीनगर येथून अबू आझमी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट मुकाबला नवाब मलिक यांच्याशी होणार असल्याने ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे. मानखुर्द - शिवाजीनगरप्रमाणे अणुशक्ती नगर हासुद्धा मुस्लिमबहुल इलाका असल्याकारणाने येथे नवा मलिक यांच्या कन्या सना मलिक हिचा सामना फहाद अहमद यांच्याशी होणार आहे. यापूर्वी या जागेवरून नवाब मलिक निवडून आले होते. या कारणाने ही लढतसुद्धा अतिशय रंगतदार असणार आहे.
उत्तर भारतीय, मुस्लिम मतं निर्णायक ठरणार : मुंबईमध्ये जवळपास 16 लाख 11 हजार उत्तर भारतीय मतदार असून, 17 लाख 87 हजार मुस्लिम मतदारांची संख्या आहे. आणि ही मतं विधानसभा निवडणुकीसाठी अतिशय निर्णायक अशी आहेत. विशेष म्हणजे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर नेहमी आगपाखड करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपासोबत वाढणारी जवळीक भाजपाला मिळणाऱ्या उत्तर भारतीयांच्या मतांवर परिणाम करेल का? अशी शक्यता निर्माण झालीय. परंतु या मुद्द्यावर स्वतः उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, राज ठाकरे हे आता क्षेत्रीय मुद्द्यावरून त्यांनी हिंदुत्वाचा राष्ट्रीय असा व्यापक मुद्दा हातात घेतला असल्याचं म्हटलंय. तर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची एक मोठा गठ्ठा मतं महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याचं स्पष्ट झालं. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने संजय उपाध्याय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने बाहेरचा उमेदवार, असा आक्षेप घेत खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी संजय उपाध्याय यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकावलं होतं. अखेर पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय.
उत्तर भारतीय उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढती
1. अणुशक्ती नगर
फहाद अहमद (शरद पवार गट) विरुद्ध सना मलिक ( अजित पवार गट)
2. मानखुर्द - शिवाजीनगर
अबू आझमी (समाजवादी पक्ष) विरुद्ध नवाब मलिक (अजित पवार गट)
3. वांद्रे पूर्व
झिशान सिद्दिकी (अजित पवार गट) विरुद्ध वरुण सरदेसाई ( उद्धव सेना)
4. चांदिवली
नसीम खान (काँग्रेस) विरुद्ध दिलीप लांडे (शिंदे सेना)
5. गोरेगाव
विद्या ठाकूर (भाजप) विरुद्ध समीर देसाई (उद्धव सेना)
6. दिंडोशी
सुनील प्रभू (उद्धव सेना) विरुद्ध संजय निरुपम (शिंदे सेना)
7. मालाड (पश्चिम)
अस्लम शेख (काँग्रेस) विरुद्ध विनोद शेलार (भाजप)
8. चारकोप
यशवंत सिंग (काँग्रेस) विरुद्ध योगेश सागर (भाजप)
9. बोरिवली
संजय उपाध्याय (भाजप) विरुद्ध संजय भोसले (उद्धवसेना)
हेही वाचा-