अमरावती : वयाच्या साधारण 22 - 23 व्या वर्षी कुष्ठरोगानं जखडलं. हा आजार बरा होईल म्हणून तिला तिच्या पतीनं अमरावतीत विदर्भ महारोगी सेवा मंडळ यांच्या तपोवन या ठिकाणी उपचारासाठी आणलं. दोन वर्षात सारं काही बरं होईल. मी दर महिन्यात भेटायला येईल, असं सांगून तो परत गेला. आज तीस ते चाळीस वर्षे उलटून गेलीत. तो केवळ एक दोनदा आला, मात्र पुन्हा कधी या परिसरात फिरकलाच नाही. आज येईल, उद्या येईल, असं करत त्याच्या प्रतीक्षेत हातभर बांगड्या आणि त्याच्या नावाचं ठळक कुंकू कपाळावर लावून ती मात्र सतत त्याची प्रतीक्षाच करतं आहे. अशा एक नव्हे तर अनेक महिलांची दुःखद कहाणी तपोवनात आहे. कुष्ठरोग बरा झाला असताना देखील तपोवनाशिवाय पर्याय नसणाऱ्या या महिलांच्या आयुष्याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
असं आहे तपोवनाचं वैशिष्ट्य : स्वातंत्र्य सैनिक आणि मानवतावादी पद्मश्री डॉ शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 मध्ये अमरावती शहरापासून सात किलोमीटर अंतरावर तपोवनाची स्थापना केली. कुष्ठरोग हा मोठा कलंक आहे. त्यासाठी समाजामध्ये असणारी भीती आणि अज्ञान दूर करण्याच्या उद्देशानं तपोवनात कुष्ठरुग्णांवर उपचार करणं यासह त्यांना उपजीविकेचं साधन निर्माण करून स्वावलंबी बनवणं हा शिवाजीराव पटवर्धन यांचा मूळ उद्देश होता. हा उद्देश बऱ्याच अंशी साध्य देखील झाला. तपोवनात कुष्ठरुग्ण आणि त्यांच्या मुलांना नवं आयुष्य मिळालं. आज देखील या ठिकाणी कुष्ठरुग्ण असणाऱ्या 100 महिला आणि 50 ते 60 पुरुष आहेत. या सर्वांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी साडेतीनशेच्या आसपास कर्मचारी देखील आहेत. एकूणच साडेतीनशे एकर परिसरात पसरलेलं तपोवनचं विश्व हे अगदी अनोख आहे.
असं आहे तपोवनातील महिलांचं आयुष्य : एखाद्या पुरुषाला कुष्ठरोग झाला तर त्याच्यावर उपचार व्हावा, यासाठी तपोवनात त्याच्यासोबत त्याची पत्नी येते. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णासाठी शासनाच्या वतीनं दोन हजार रुपये अनुदान मिळतं. तो रुग्ण बेडवर असला, तरच ही रक्कम मिळते. मात्र आपल्या पतीसोबतच तो बरा होईपर्यंत राहणाऱ्या त्याच्या पत्नीची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था तपोवन संस्थेलाच करावी लागते. पती बरा झाल्यावर त्याला घेऊन पत्नी आपल्या घरी परतते. या उलट मात्र एखाद्याच्या पत्नीला हा आजार जडला, तर तिचा पती तिला तपोवनात घेऊन येतो. तिला इथं सोडल्यावर तो पुढल्या महिन्यात भेटायला येतो. दर महिन्यात भेटायला येईल, असं सांगून जातो, मात्र तो परत कधी येतच नाही, असे अनेक उदाहरणं तपोवनात आहेत. एक दोघं एक दोन महिने भेटायला आलेत, मात्र काही तर पत्नीला इथं सोडून गेल्यावर कधी तपोवनात फिरकलेच नाहीत. आपला नवरा येईल या आशेनं मात्र चार-पाच महिला या चक्क मनोरुग्ण झाल्यात, अशी माहिती तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ सुभाष गवई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
रात्री दोन वाजता उठून ती जंगलात करते झाडझुड : "जळगाव जिल्ह्यातील महिलेला 27 वर्षांपूर्वी कुष्ठरोग बरा व्हावा म्हणून तिच्या पतीनं तपोवनात उपचारासाठी आणलं. आपला पती आपल्याला आज घ्यायला येईल, उद्या घ्यायला येईल या प्रतीक्षेनं तिला चक्क मनोरुग्ण केलं. तपोवन परिसराच्या बाजूनं घनदाट जंगल असून या जंगलात बिबट आहेत. तपोवन परिसरात अनेकदा भर दिवसादेखील बिबट दिसतो. असं असताना ही महिला चक्क रात्री दीड- दोन वाजता उठून जंगल परिसरात असणाऱ्या विठ्ठल मंदिरालगत झाडाखाली ती झाडझुड करते. परिसरात बिबट असल्यामुळं तिचं असं अर्ध्या रात्री उठून जंगलाच्या दिशेनं जाणं आणि झाडाखाली झाडणं हे आमच्यासाठी अतिशय कठीण झालंय. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रात्री परिसरात कुठंही बिबट दिसला तर तिच्या काळजीसाठी आम्हाला रात्रीबेरात्री संस्थेत धावून यावं लागते. सुदैवानं आजपर्यंत बिबट्यानं तिला काही केलं नाही," असं प्रा डॉ सुभाष गवई यांनी सांगितलं.
कुष्ठरुग्णांच्या मृतदेहाला कुटुंबीयांचा दुरूनच नमस्कार : तपोवनात आज जवळपास 100 कुष्ठरुग्ण महिला आहेत. त्यापैकी अनेक जण बऱ्या झाल्या असल्या, तरी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारलं नाही. त्यांचं सारं आयुष्य हे तपवनातच जाते. या महिलांसोबत आपुलकीनं संवाद साधणं, त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये रमणं हा एक अनोखा अनुभव असल्याचं प्रा डॉ सुभाष गवई म्हणाले. "या कुष्ठरुग्ण महिलांचं किंवा इथल्या कुष्ठरोगी पुरुषांचं निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही कळवतो. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी येतात, मात्र मृतदेहाला दुरूनच नमस्कार करून परततात. आम्हीच संस्थेतील कर्मचारी त्यांची तिरडी खांद्यावर घेतो. परिसरातच असणाऱ्या स्मशानात अंत्यसंस्कार करतो. काही जणांचे नातेवाईक तर तुम्हीच उरकून टाका, असा निरोप पाठवतात," असं देखील प्रा. डॉ. सुभाष गवई म्हणाले.
तपोवनात येणाऱ्यांना गावबंदी ! : "खरंतर पूर्वी तपोवनात येणाऱ्या व्यक्तीला गावात बंदी केली जायची. या ठिकाणी एखादा रुग्ण आला तर त्याला गावात कधीही परत येण्यास परवानगी नसायची. आज देखील अनेक गावांमध्ये तपोवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोण तसाच आहे. तपोवनात सर्वाधिक महिला रुग्ण या खानदेशातील जळगाव, नांदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यातल्या आहेत. त्यांची अहिराणी भाषा विदर्भातल्या रुग्ण महिलांना अनेकदा कळत नाही. मात्र सर्वांच्याच भावना आणि दुःख हे समान आहेत. आता कुष्ठरोगावर बाहेर औषधं मिळायला लागलीत. यामुळं तपोवनात उपचारासाठी जाऊन बदनामी होईल, या भीतीनं अनेक रुग्ण तपोवनात येत नाहीत," असं देखील प्रा. डॉ. सुभाष गवई यांनी सांगितलं.
हेही वाचा :