जळगाव : राज्याच्या राजकारणात प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे, तसतशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील तासगाव येथील सभेत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले? : रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "महायुतीच्या नेत्यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळात 60 ते 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय. आकड्यासकट मी पुरावे दिले आहेत. आता विधानसभा निवडणुकीसाठी 5 ते 6 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. एवढा पैसा खर्च केला जातोय, हा पैशाचा पूर आहे. कितीही पैशांचा पूर आला, तरी येथील स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीसोबत राहील."
लाडका साडू योजना प्रसिद्ध : "गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाहीत, म्हणूनच जळगाव जिल्ह्यात भाजपामध्ये सर्वात मोठी बंडखोरी झाली. आमदार मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांना डावलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय झाले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ठेके दिले. चाळीसगाव मतदारसंघात लाडक्या बहिणीनंतर नंतर लाडका साडू ही योजना प्रसिद्ध असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
बंडखोर उमेदवाराची समजूत : "आमच्या सर्व उमेदवारांनी एकत्रित येऊन प्रचाराला सुरूवात केलीय. चाळीसगाव मतदारसंघातून आमचे उमेदवार उन्मेश पाटील हे चांगल्या मतांनी निवडून येतील. विरोधकांनी कितीही पैसा टाकला तरी आमच्याकडे स्वाभिमानी लोक आहेत, त्यामुळं येथे महाविकास आघाडीचा विजय होईल. पाचोऱ्यातील महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असं रोहित पवार म्हणालेत.
हेही वाचा