नाशिक Nashik Crime News : नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात गेल्या दोन महिन्यांपासून अनाधिकृतपणे राहत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह अन्य एकाला एटीएस पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडं कुठल्याच आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. ही माहिती नाशिकच्या स्थानिक पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या पाथर्डी गाव परिसरात गेल्या दोन महिन्यापासून बांगलादेशातून आलेले तिघेजण वास्तव्यास होते. याची माहिती एटीएस पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. त्या राहत असलेल्या काझी मंजिल या परिसरातील त्यांच्या घरावर छापा टाकत दोघा महिलांसह एका पुरुषास अटक केली. मात्र, त्यांच्या घर झडतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
गुन्हा दाखल : बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करून नाशिकमध्ये राहणारे संशयित शागोर मोहम्मद हुसेन मानिक, मुसमत शापला खातून आणि मोहम्मद शेखयांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच त्यांना कागदपत्रांसह सर्वतोपरी मदत करणाऱ्या गोरक्ष जाधव यालाही ताब्यात घेण्यात आलंय. नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक योगिता जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनाधिकृतपणे भारतात प्रवेश केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित महिलांपैकी एक महिला ब्युटी पार्लरमध्ये तर दुसरी महिला स्पामध्ये कामाला असल्याचं तपासात समोर आलंय.