नागपूर Illegal Onion Export : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलीय. कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार आहे. भारत सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध घातल्यानं अनेक देशांमध्ये कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळं आता भारतातून कांदा तस्करीचे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत. त्यातच नागपूर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोमॅटोच्या बॉक्समधून होणारी कांद्याची तस्करी रोखण्यात मोठं यश मिळवलंय. सीमाशुल्क विभागानं गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून यात तब्बल 82.93 मेट्रिक टन कांद्याच्या अवैधरीत्या निर्यातीचा प्रयत्न होता अशी माहिती पुढं आलीय.
82.93 मेट्रिक टन कांदा जप्त : नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिकला राहणारे दोन निर्यातदार नागपूर इथून संयुक्त अरब अमिरात (यूएई) इथं कांदा तस्करीच्या प्रयत्नांत असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर सीमाशुल्क विभागानं लगेच कारवाईला सुरुवात केली. दोन कंटेनर भरुन टोमॅटो नागपूर इथून संयुक्त अरब अमिरात (यूएई) इथं निर्यात केले जाणार आहेत. परंतु, त्या टोमॅटोच्या बॉक्सच्या आत टोमॅटो कमी आणि कांदे अधिक आहेत. या माहितीच्या आधारे कस्टम विभागाच्या पथकानं कंटेनरची कसून तपासणी केली तेव्हा त्यात शेकडो बॉक्स ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. वरच्या भागातील ५ फूट पर्यंत टोमॅटोचे बॉक्स ठेवण्यात आलेले होते. नंतर त्याखालील सर्व बॉक्सच्या आत पोत्यात कांदे भरलेले आढळून आले. कंटेरनमधील हे सर्व बॉक्स जप्त केल्यानंतर कांद्याचं वजन करण्यात आलं. तेव्हा पोत्यात 82.93 मेट्रिक टन कांदा आढळून आला. त्यानंतर या पथकानं मुंबईतील तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या निर्यातदार आणि कस्टम दलालांच्या अनेक ठिकाणी झडती घेतलीय.