कोल्हापूर : मागील काही महिन्यांपासून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी (दि. १२) कळंबा इथ साई मंदिराजवळ असलेल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं पर्दाफाश केला. तसंच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडत वरणगे पाडळी इथून ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन कारवाया झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचं मोठ रॅकेट असल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाची छापा टाकून कारवाई :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "कोल्हापुरातील कळंबा इथं श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडं प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं बुधवारी करवीर पोलिसांच्या मदतीनं श्रद्धा हॉस्पिटलमध्ये डमी रुग्ण पाठवून सापळा रचला. हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली ताईगडे यांनी रुग्णाची तपासणी करून गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी मशीन येत असल्याचं सांगितलं आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याची खात्री पटताच आरोग्य विभागाच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली."
गर्भपाताच्या गोळ्या घरपोच देण्याची सोय :गर्भपात करण्याच्या गोळ्या घरपोच देण्यासाठी डॉ. दीपाली ताईगडे यांना दोन महिला साथ असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकानं सुप्रिया संतोष माने (४२, रा. रायगड कॉलनी) आणि धनश्री अरुण भोसले (३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) यांना संपर्क करून वरणगे पाडळी इथं बोलावून घेत गोळ्यांसह रांगेहात पकडलं. आता, या गोळ्या कुठून आल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. काल दिवसभर तपास करून पोलीस आणि आरोग्य विभागानं हॉस्पिटल सील केलं आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या. डॉ. दीपाली ताईगडे आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले अधिक तपास करीत आहेत.