दौंड (पुणे) Ganeshwari in Bhuleshwar Temple :अखंड महाराष्ट्रातील जागृत देवस्थान पुणे जिल्ह्यात प्राचीन कलेचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात श्री गणेशाचे विविध रुपात दर्शन होते. भुलेश्वर मंदिरात स्त्री रुपातील गणेशाचे अर्थात गणेश्वरीचे देखील दर्शन होते. दगडात कोरलेला स्त्री रुपातील गणेश्वरी लक्ष वेधून घेते.
या विविध रुपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भुलेश्वर मंदिरास भेट देतात. मंदिरात माडीवर खांबावर एक गणेशमूर्ती दिसते. याचे वेगळेपण म्हणजे योगासन केल्याप्रमाणे डाव्या पायावर मूर्ती असून उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्या वर टेकवला आहे व दोन्ही हाताने उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. याला शक्ती गणपती किंवा गणेश्वरी असंही म्हणतात.
तसंच भुलेश्वर गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन करुन बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाकडे जाताना दक्षिण दरवाज्याजवळ एका खांबावर एक गणेश मूर्ती दोन्ही हात तसंच पाठ छताला लावलेली दिसते. या मूर्तीकडे पाहिल्यावर जणू काही या गणेशाने संपूर्ण मंदिराचा भार आपल्या पाठीवर संभाळला आहे असं प्रतीत होतं. पुढे प्रदक्षिणा मार्गावर मकर तोरणे दिसतात. यामध्ये सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. यामध्ये गणेशाचे स्त्रीरुप सुध्दा पहावयास मिळते. ही मूर्ती पद्मासन घालून आसनस्थ व चतुर्भुज आहे तर खाली मूषक वाहन आहे. शेजारीच ब्रम्हा, विष्णू, महादेव, कार्तिकेय वगैरे अशा विविध देवतांच्या सुध्दा स्त्रीरुपातील मूर्ती आढळतात.