पुणे IAS Pooja Khedkar :ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरूवातीला अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला बोलावून देखील गैरहजर राहिल्या. एवढंच नव्हे तर मोठी संपत्ती असूनही त्यांनी आयएएससाठी दिलेलं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करत असताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जमीन खरेदी केली. खेडकर यांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवरदेखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी महिला बाऊन्सर सोबत घेऊन गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकवल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
सातबाऱ्यावर मी मालक : व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर म्हणतात, "जमीन माझ्या नावावर आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. कोर्टाचे कागद मला आणून दाखवा. मी पण कोर्टात गेलीय. काय व्हायचं ते होऊ दे. गरीब असो श्रीमंत असो कायदा सर्वांना सारखा आहे. मलाही माहिती आहे. सातबाऱ्यावर मी मालक आहे. अरे तुरे बोलायचं नाही," असं म्हणत मनोरमा खेडकर एका शेतकऱ्याबरोबर वाद घालताना दिसत आहेत. या घटनेबाबत या शेतकऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. अजूनही शेतकऱ्याची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्यानं प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पुणे न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट-खेडकर कुटुंबीयांचे वकील रविंद्र सुतार यांनी व्हायरल व्हिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, मुळशी येथील जमीन खेडकर कुटंबानं विकत घेतलेली आहे. ही जमीन कसण्यासाठी गेलेले असताना मनोरमा यांना तेथील लोकांनी मज्जाव केला. याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. हे प्रकरण पुणे न्यायालयात आहे. मनोरमा यांच्याकडं परवाना असलेले पिस्तूल आहे. ते स्वरंक्षणासाठी आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा जून २०२३ मधील आहे."