महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मला कुठलीही क्लीनचिट नाही, तो सर्वस्वी न्यायालयाचा निर्णय आहे, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - AJIT PAWAR

जेव्हा मी विरोधकांसोबत असतो, तेव्हा चांगला असतो. विरोधकांच्या आरोपात कुठलंही तथ्य नसून राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असेही अजित पवार म्हणालेत.

ajit pawar
अजित पवार (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 5:04 PM IST

मुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्राप्तिकर विभागाने 2021 च्या छापेमारी प्रकरणातून मोठा दिलासा दिलाय. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित 1 हजार कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली आहे. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासह भाजपावर टीकेचे झोड उठवलीय. अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत असताना विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत.

नवल वाटण्यासारखे काही नाही : दिल्ली लवादाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची 1 हजार कोटींची मालमत्ता मुक्त करण्याचा निर्णय दिलाय. यावर बोलताना काँग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, आताच्या परिस्थितीमध्ये आरोप करणारे आणि क्लीनचिट देणारे हे एकाच घरातील आहेत. या कारणाने भाजपाच्या घरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वजण स्वच्छ होतात, याउलट ते जेव्हा घरापासून दूर जातात तेव्हा ती व्यक्ती अस्वच्छ होते. त्यांचे कपडे हे धूळ अन् मातीने माखलेले दिसतात. परंतु भाजपाच्या घरात गेल्याबरोबर ते स्वच्छ होतात. या कारणाने अजित पवार यांच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय.

विरोधकांसोबत असतो तेव्हा चांगला असतो :या प्रकरणावर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना दुसरीकडे अजित पवारांनी मात्र लवादाने यासंबंधी दिलेला निर्णय हा एका प्रक्रियेचा भाग असल्याची प्रतिक्रिया दिलीय. याप्रसंगी प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणालेत की, कुठल्याही कोर्टाचा निकाल हा एका दिवसात येत नाही. मी इतकी वर्ष विरोधकांसोबत काम केलंय. जर का मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत काम केलं असतं का? म्हणून उगाच काहीतरी बोलायचं, आरोप करायचा म्हणून करू नका. विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मला जिथे न्याय मिळेल, असं वाटत होतं, मी तिकडे गेलो आणि न्याय मागितला. जेव्हा मी विरोधकांसोबत असतो, तेव्हा चांगला असतो. विरोधकांच्या आरोपात कुठलंही तथ्य नसून राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असेही अजित पवार म्हणालेत.

कामकाजात सहभागी होता येणार नाही :विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार घातलाय. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणालेत की, आपण काहीतरी वेगळे करीत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी करीत आहेत. शपथविधीच्या सुरुवातीला ते सभागृहात बसलेत, परंतु थोड्या वेळानंतर ते सभागृहाबाहेर पडले. त्यावर मी त्यांना कुठे चाललात, असं विचारलं असता त्यांनी बाहेर जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला समजले की, विरोधकांनी आज आमदारकीची शपथ न घेण्याचा पवित्रा घेतलाय. परंतु विरोधकांना उद्या सायंकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आमदारकीची शपथ घ्यावी लागणार आहे. अन्यथा सोमवारी होणाऱ्या सभागृहाच्या कामकाजामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही, असेही अजित पवार म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details