चंद्रपूरHuman vs Wildlife Conflict: चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जितके वाघ आहेत त्यापेक्षाही अधिक वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यातील इतरत्र जंगलात विखुरलेले आहेत. ब्रह्मपुरी तालुका यात अग्रणी आहे. इथे या वाघांची संख्या वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे येथील वाघांना स्थानांतरित करण्याचा प्रयोग देखील प्राथमिक स्तरावर सुरू आहे.
बल्लारपूर वनपरिक्षेत्र का आलंय प्रकाशझोतात?बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक विभागात जिथे एकसमान जंगल नसून ते विखुरलेले जंगल असते असे जंगल प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत येते; मात्र हे जंगल वन्यजीवांचे स्थलांतर करण्यासाठी लागणाऱ्या कॉरिडॉरमध्ये येतं. त्यामुळे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी वाघ तसेच इतर वन्यजीव याच मार्गाचा अवलंब करतात; परंतु या परिसरात गावे असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा देखील धोका असतो. मागील दहा महिन्यात बल्लारपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत पाच वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील काही मृत्यू हे भक्ष्य न मिळाल्याने झाले असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर याच दरम्यान वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
वाघांच्या मृत्यूच्या घटना :29 जुलै 2023 ला बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपवनपरिक्षेत्र येथे वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. 7 सप्टेंबर 2023 ला याच परिसरात दोन बछडे मृतावस्थेत तर एक बछडा अशक्त अवस्थेत आढळून आला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता. वाघिणीपासून दुरावल्यामुळे भूकेमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी 8 मे रोजी याच क्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. अशा प्रकारे पाच वाघांचा या दहा महिन्यांत मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे.