मुंबई :बुधवारी दुपारी 4 वाजता नौदलाची मोटर बोट 'नीलकमल' या प्रवासी बोटीला धडकली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत शंभरच्यावर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अद्यापही दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील अधीक्षक, विनायक सावर्डेकर यांनी दिली आहे.
सर्व अपघातग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर: नीलकमल बोट दुर्घटना घडल्यानंतर सायंकाळी सेंट जॉर्ज रुग्णालयात 9 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यातील 7 जणांनी स्वतःच्या इच्छेनं डिस्चार्ज घेतला होता. तर सकाळी दोन जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे आणि सायंकाळी एकाने डिस्चार्ज घेतला. त्यामुळं नऊपैकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सर्वांना सध्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. जर भविष्यात पुन्हा त्यांना उपचाराची गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात उपचार देण्यात येतील, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक विनायक सावर्डेकर यांनी दिली आहे.
दोन जण अद्याप गायब :बुधवारी बोट दुर्घटना घडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, बोटीतून 110 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली. तर या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 95 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यातील जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तर या 110 मधील अजूनही दोनजण गायब असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.