मुंबई-पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही. मुंबईत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. मुंबईत एका टोळीने खोटी आणि बोगस कागदपत्रं बनवून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवलं. या कर्जाच्या पैशातून नामांकित कंपन्यांची मोटार वाहने खरेदी केली. त्या वाहनांची देशातील वेगवेगळ्या राज्यात विक्री केली. ती वाहनं गहाण ठेवून बँकांची आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केलीय. मात्र याबाबत एक तक्रार आल्यानंतर सापळा रचत या टोळीला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा 3 ने अटक केलीय.
सात आरोपींना अटक :दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. टोळीतील आरोपींनी बनावट आधार कार्ड बनविणे, वाहनांचे आरसी बुक बनविणे, एमएमआरडीएचे अलॉटमेंट लेटर बनविणे, बँक स्टेटमेंट बनविणे, आयकर विवरणपत्रे तयार करून त्याच्या माध्यमातून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवले होते. ही टोळी वाहन कर्ज मिळवून महागड्या मोटार वाहन खरेदी करत होती आणि ही महागडी वाहनं देशातील विविध राज्यांमध्ये आरसी बुकच्या आधारे विकत होती. चोरीच्या गाड्यांमध्ये बदल करून त्या गाड्यांची विक्री करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रकरण कसे समोर आले? :24 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदीप शर्मा या व्यक्तीने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल कंपनीकडून महिंद्रा थार ही गाडी घेण्यासाठी कर्ज घेतले. त्यासाठी त्याने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार केली. यावेळी त्याने 16,03,627 रुपये इतके कर्ज बँकेकडून मंजूर करून घेतले. मात्र ही बाब महिंद्रा कंपनीच्या लक्षात आली. यानंतर प्रदीप शर्माने कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या कक्ष 3 च्या तपास पथकाने सखोल तपास सुरू केला आणि ही आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांना सापळ रचला आणि या टोळीला पोलिसांना गजाआड केले.
बोगस कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड, बिंग कसे फुटले? - LOAN CHEATER GROUP ARRESTED
एका टोळीनं वाहनं गहाण ठेवून बँकांची आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केलीय. याबाबत एक तक्रार आल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा 3ने त्यांना अटक केलीय.

Published : Feb 25, 2025, 1:19 PM IST
|Updated : Feb 25, 2025, 1:48 PM IST
पोलिसांकडून गाड्या जप्त :दरम्यान, तक्रारीनंतर अन्वये भादंवि कलम 420, 468, 471, 120(2), 34, 406, 465, 467 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांना या आंतरराज्यीय टोळीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून विविध कंपनीच्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी इंदुर, मध्य प्रदेश, मुंबई, ठाणे, गुजरात येथे शोधमोहीम राबवून 7 आरोपींना अटक केलीय. आरोपींकडून आतापर्यंत 16 विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्यात. याची किंमत सुमारे 7 कोटी 30 लाख 28 हजार रुपये आहे. दरम्यान, असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांना केलंय.
हेही वाचा -