बीड: गावातील एका मुलीचा एचआयव्हीमुळं मृत्यू झाला होता अशी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्यामुळं कुटूंबाची समाजात बदनामी झाली. गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं, कोणीही भेटत नाही किंवा जवळ येत नाही अशी आपबिती आष्टी तालुक्यातील एका पीडित कुटुंबानं सांगितली.
आत्महत्येचा केला प्रयत्न : बीडच्या आष्टी तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. एचआयव्हीच्या अफवेमुळं पीडित कुटुंबातील महिलेने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबल्याचं पीडित कुटुंबच म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ.ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांची ऑडियो क्लिप : यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडियो क्लिप दाखवली आहे. यात पोलीस कर्मचारी काळे हे तुमच्या मुलीला एचआयव्ही होता असं सांगत आहेत. तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली.
गावाने वाळीत टाकलं: मुलीच्या सासरकडील लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीनं खोटं सांगितलं. त्यामुळं आम्हाला खूप त्रास होत आहे. गावानं आम्हाला वाळीत टाकलं, कोणीही जवळ येत नाही, बोलत नाही. यांना एचआयव्ही आहे असं बोलतात. त्यामुळं माझी पत्नी दोनवेळा आत्महत्येसाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीनं सांगितलं.
आम्हाला न्याय द्या :"आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे नातेवाईक देखील आम्हाला भेटायला आले नाहीत. कोणी जवळ येत नाहीत. फक्त अफेमुळं आमच्या वाट्याला हे दुःख आलं आहे. आम्हाला न्याय द्या" अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.