मुंबई Hit and run on Versova Chowpatty :वरळीच्या हिट अँड रननंतर पुन्हा वर्सोव्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या दोघांना भरधाव वेगात असलेल्या जीपनं चिरडल्याची घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर मोटारचालक कारसह तेथून पळून गेला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर मोटारचालकाला अटक केली आहे.
अशी घडली घटना : गणेश यादव (वय 35) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गणेश यादव हे रिक्षाचालक होते. ते वर्सोवा चौपाटीजवळील सागर कुटीर संघ इथं राहत होते. रविवारी मध्यरात्री गणेश यादव आणि तक्रारदार बबलू श्रीवास्तव हे दोघे वर्सोवा चौपाटीवर वाळूवर झोपण्यासाठी गेले होते. या भागात जास्त रहदारी नसल्यानं त्यांनी चौपाटीवर झोपण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गणेश यांच्या अंगावरून एक भरधाव मोटार वेगात गेली. तसंच बबलु श्रीवास्तव यांच्या उजव्या हाताला गाडी घासून गेली. त्यानंतर बबलू यांना जाग आली. त्यानंतर त्यांना गणेश यादव रक्ताच्या थारोळ्यात पडले दिसले. तेथून जवळच एमएच -31 एफई- 3033 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जीप उभी होती. त्यातून दोन व्यक्तींनी जीपबाहेर पडून जखमींची पाहणी केली. त्यावेळी त्यांना गणेश यादव यांच्या शरीराची हालचाल बंद झाल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.