महाराष्ट्र

maharashtra

लग्न सोडून अफगाणिस्तानचे 'दुल्हा' आले भारतात; अचलपूरमध्ये आहे त्यांचा दर्गा, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध - Dulha Shah Rahman Ghazi Dargah

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 7:02 PM IST

Updated : Jul 19, 2024, 12:41 PM IST

Dulha Shah Rahman Ghazi Dargah : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या अचलपूर येथील गाझी दूल्हे रहमान शहा यांचा दर्गा असलेल्या मशिदीत भारतासह परदेशातून भाविक दर्शनाला येतात. 'ईटीव्ही भारत'नं हजरत बादशाह दुल्हे रहमान शहा गाझी यांच्या या दर्ग्या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रंजक इतिहास समोर आला.

Dulha Shah Rahman Ghazi Dargah
हजरत बादशाह दूल्हे रहमान शाह गाझी दर्गा (ETV BHARAT Reporter)

अमरावती Dulha Shah Rahman Ghazi Dargah: स्वतःचे लग्न सोडून अफगाणिस्तानातून भारताकडे निघालेले रहमान शहा हे इ.स. 1020 ते 1030 दरम्यान भारतात आले. याचं कारण असं सांगितलं जातं की, 'माझे डोळे फोडलेत माझ्यावर अन्याय झाला', अशी फिर्याद घेऊन एक फकीर भारतातून अफगाणिस्तानात दाखल झाले. या फकीराला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः भारतात जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला. या रहमान शहा यांच्या दोन माजार भारतात आहेत. एक माजार ही मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात उमरी या गावात आहे. तर दुसरी माजार ही अमरावती जिल्ह्यात अचलपूर या ठिकाणी आहे.

  • अचलपूर ठिकाणी माजार : दोन्ही माजारचे वैशिष्ट्य म्हणजे उमरी येथील माजारमध्ये रहमान शहा यांचे शिर दफन करण्यात आले. तर अचलपूर या ठिकाणी दफन केलेल्या त्यांच्या धडाच्या ठिकाणी माजार बांधण्यात आली. नवरदेवाच्या वेशातच असतानाच भारतात आल्यामुळं रहमान शहा यांची माजार 'हजरत बादशाह दुल्हे रहमान शाह गाझी' या नावानं ओळखली जाते.

फकीर फिर्याद घेऊन पोहोचला अफगाणिस्तानला :इ. स.1000 च्या दरम्यान इलिचपूर या ठिकाणी ईलीच याचं राज्य होतं. राज्यातील एका फकिराची विद्वत्ता पाहता राजा ईलीचनं त्या फकिराला आपल्या राज दरबारात सन्मानाचं स्थान दिलं. फकीराला आपल्या राज्यात सन्मानाने मान दिला असतानाच अनेकदा त्यांच्यात चर्चा व्हायची. अशाच एका चर्चेदरम्यान काही कारणांमुळे ईलीच राजानं त्या फकिराचे दोन्ही डोळे फोडले, असं म्हटलं जातं.

फुटक्या डोळ्यांनी फकीर पोचला अफगाणिस्तानला : ईलीच राजाने दोन्ही डोळे फोडले असताना तो फकीर अतिशय बिकट परिस्थितीत कसाबसा अफगाणिस्तानला पोहोचला. आपल्यावर झालेल्या अन्यायाची गाथा त्यानं अफगाणिस्थानातील शासकांना सांगितली. त्यावेळी रहमान शहा यांनी फकिराला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवावी, अशी विनंती सुलतानाकडे विनंती केली. रहमान शहा यांचे लग्न असतानादेखील ते आपले सैन्य घेऊन भारतात इलीचपूरला आले. विशेष म्हणजे रहमान शहा यांच्यासोबत त्यांची आईदेखील भारतात आली.

ईलीच आणि रहमान शहा यांच्यात साडेबारावर्षे चालले युद्ध : फकिराचे डोळे फोडल्यामुळं ईलीच राजाचा बदला घेण्यासाठी भारतात पुढच्या दिशेने निघालेल्या रहमान शहा यांनी सर्वात आधी ईलीच राजाचे राज्य असणाऱ्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात येणारा खेरला येथील किल्ला जिंकला. यानंतर इलीचपूर ताब्यात घेण्यासाठी रहमान शहा आणि ईलीच राजा यांच्यात साडेबारावर्ष युद्ध चाललं. या युद्धात अखेरी दोघेही ठार झाले. या युद्धानंतर ईलीच राजाच्या सत्तेचा अंत झाला.

दुल्हे रहमान शहांच्या दोन मजारी : ईलीच राजासोबत तब्बल साडेबारावर्ष युद्ध केल्यावर रहमान शहा युद्धातच ठार झाले. त्यांची मान कापण्यात आली. त्यांचे धड अचलपूरला दफन करण्यात आले. तर त्यांचे शीर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात येणाऱ्या उमरी या गावात दफन करण्यात आले. अचलपूर येथे रहमान शहा यांच्या आईची माजार आहे. त्यांच्या आईच्या पायाशीच रहमान शहा यांना दफन करून माजार बांधण्यात आली. रहमान शहा यांच्या अचलपूर आणि उमरी या ठिकाणी असणाऱ्या माजार परिसरात त्यांच्या सैन्यातील अनेक सैनिकांच्या माजार देखील आहेत, असं सांगण्यात येतं. रहमान शहा यांच्या अचलपूर आणि खैरला या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या माजारींना हजरत बादशहा दुल्हे रहमान शहा गाजी या नावानं ओळखलं जातं.

असे वाढले मजारीचे महत्व : हजरत बादशहा दुल्हे रहमान शहा गाजी यांची मजार अचलपूरला बांधण्यात आल्यावर तब्बल पावणेदोनशे वर्षानंतर इ.स. 1294 मध्ये अलाउद्दीन खिलजी दक्षिणेकडे आला असताना, अचलपूर या ठिकाणी त्याचा मुक्काम होता. देवगिरी अर्थात दौलताबादची माहिती अलाउद्दीन खिलजी यानं अचलपूर येथून घेतली. दुल्हे रहमान शहा गाझी यांचा पवित्र दर्गा अचलपूरला असल्याचं त्याला कळलं. अलाउद्दीन खिलजी याने या दर्गाचं बांधकाम केलं. कालांतराने या दर्गाला देश-विदेशातून मदत मिळायला लागली. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे श्रद्धा केंद्र म्हणून दुल्हे रहमान शहा दर्गाची ओळख निर्माण झाली. दिल्लीतले मुघल शासक, नागपूरचे राजे रघुजी भोसले आणि हैदराबादचे निजाम यांनी वेळोवेळी दुल्हे रहमान शहा यांच्या दर्ग्याला निधी देऊन या ठिकाणाचे महत्त्व वाढवल्याची माहिती, इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी ई'टीव्ही भारत' शी बोलताना दिली.

हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान : हजरत बादशहा दुल्हे रहमान शहा गाझी यांच्या दर्गावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा असल्यामुळं अनेक हिंदू-मुस्लिमांची या ठिकाणावर श्रद्धा वाढली. दरवर्षी देशभरातील हिंदू मुस्लिमांसह परदेशातील मुस्लिम बांधवदेखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात अशी माहिती, दर्गा परिसर व्यवस्थापन मंडळातील सदस्य मोहम्मद फइम यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Aurangzeb controversy : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला वाहली फुले, नव्या वादाला फोडले तोंड
  2. Grill Lock On Grave : पाकिस्तानमध्ये बलात्कार रोखण्यासाठी कबरीवर लोखंडी जाळीचे कुलूप लावल्याचा दावा; फॅक्ट चेकमध्ये हे सत्य झाले उघड
Last Updated : Jul 19, 2024, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details