अमरावती Raja Mansingh Samadhi Amravati : दिल्लीच्या गादीवर इसवी सन 1556 ते 1605 पर्यंत म्हणजेच 49 वर्ष असणारा बादशहा अकबर याच्या दरबारात एकूण नवरत्न होते. राजा बिरबल, तानसेन, अब्दुल फजल, फैजी, राजा मानसिंह, राजा टोडरमल, मुल्ला दो पियाजा, फकीर अजयाउद्दिन आणि अब्दुल रहीम खान ए खाना अशी हा नवरात्रांची नाव आहेत. यापैकी अकबराच्या सैन्याचा सेनापती आणि अकबराचे सासरे भारमल यांचा नातू तसंच महाराणा प्रताप यांच्या विरोधात हलदीघाटीची ऐतिहासिक लढाई जिंकणारा राजस्थानमधील आमेरचा राजा मानसिंहयाची समाधी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरालगत आहे. विशेष म्हणजे, या समाधीवर दिवा लावण्यासाठी राजस्थानमधून पैसे येतात. अचलपूर लगत सुधाकर नाकील यांच्या शेताला लागून असणाऱ्या राजा मानसिंहाच्या समाधी संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक माहिती समोर आली आहे.
राजा मानसिंह याची समाधी (ETV Bharat Reporter) राजा मानसिंह अकबराचा एकनिष्ठ सेनापती :राजस्थानमधील आमेरचे राजे भारमल यांची मुलगी जोधाबाई ही अकबराची पत्नी होती. जोधाबाईचा भाऊ भगवानदास यांचा मानसिंह हा दत्तक मुलगा होता. मानसिंह हा अकबराच्या सेनेचा प्रमुख होता. बादशाह अकबरसाठी राजा मानसिंह यानं अनेक लढाया जिंकल्या. ओडीसा, आसामपासून थेट काबुल पर्यंत अकबराचं साम्राज्य वाढवलं. बादशहा अकबरला विरोध करणाऱ्या महाराणा प्रताप यांचा राजा मानसिंह यानं 21 जून 1576 ला झालेल्या हलदीघाटीच्या लढाईत पराभव केला. बादशाह अकबर सोबत कायम एकनिष्ठ असणारा राजा मानसिंह याचा बादशहाच्या दरबारात मोठा मान होता. अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जहांगीरसोबत निर्माण झाले वितृष्ट : राणी जोधाबाई यांचे वडील आणि बादशाह अकबरचे सासरे भारमल यांचा मुलगा भगवानदास यांच्या मानबाई या मुलीचा विवाह अकबराचा मुलगा जहांगीर याच्यासोबत लावण्यात आला. अकबरानंतर दिल्लीच्या गादीवर जहांगीर ऐवजी जहांगीरच्या मुलाला अर्थात आपल्या भाच्याला बसविण्यात यावं अशी राजा मानसिंहची इच्छा होती आणि त्यानं यासाठी तसे प्रयत्न देखील केलेत. 1605 मध्ये दिल्लीच्या गादीवर जहांगीर विराजमान झाल्यावर राजा मानसिंह याचं असं वागणं जहांगीरला खटकलं. बादशहा जहांगीरनं स्वतःच्या मुलाला कैदेत टाकून राजा मानसिंह यांना दिल्लीपासून दूर दक्षिणेची जबाबदारी सोपविली आणि त्यामुळं राजा मानसिंह दक्षिणेत इलीचपूर अर्थात आजच्या अचलपूर पर्यंत येऊन पोहोचले.
राजा मानसिंह यांनी केली आत्महत्या : यापूर्वी महाराष्ट्रात येऊन गेलेला राजा मानसिंह हा मध्य दक्षिणेत अचलपूर कडे आला. अचलपूरमध्ये त्याची बऱ्याच दिवस छावणी होती. तो दक्षिणेत असतानाच त्याचा भाचा दिल्लीत एका किल्ल्यात मारला गेला होता. त्याची बहीण मानबाईचा देखील मृत्यू झाला. सगळीकडून नकारात्मक बातम्या येत असल्यामुळं राजा मानसिंह हा खचला होता. 1612 मध्ये अचलपूरला त्याची छावणी आसताना त्याला कोड फुटला. दिसायला अतिशय देखणा असणाऱ्या राजा मानसिंहाला कोड फुटल्यामुळं धक्का बसला. कोड घेऊन आपल्याला जगायचं नाही असा त्यानं निश्चय केला आणि आपल्या सैनिकांना मला ठार मारा असे आदेश त्याने दिले. मात्र सैनिकांनी त्याचा हा आदेश मानला नाही. अखेर राजा मानसिंह यांनी आत्महत्या केली. ज्या ठिकाणी राजा मानसिंह यानं आत्महत्या केली त्या ठिकाणीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि राजा मानसिंह याच्या स्मरणार्थ समाधी देखील बांधण्यात आली, अशी माहिती देखील प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी दिली.
समाधीवर दिवा लावण्यासाठी राजस्थानमधून येतात पैसे :अचलपूर शहरापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर सुलतानपुरा परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या मागे सुधाकर नाकील यांच्या शेतालगत राजा मानसिंहची समाधी आहे. 1935 मध्ये जयपूरचे राजे सवाई मानसिंह यांनी राजा मानसिंह यांच्या समाधी स्थळाची जपणूक करण्यासाठी समाधीवर दिवा लावण्याकरिता 30 रुपयांची रक्कम दरमहा पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासंदर्भातील मजकूर इंग्रजी भाषेत संगमरवरी दगडामध्ये कोरुन समाधीस्थळावर लावण्यात आला आहे. समाधीस्थळावर लाल बहादुर ठाकूर या व्यक्तीकडे समाधीवर दिवा लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. राजा मानसिंह यांच्या समाधी ओट्यावर कालांतरानं महादेवाचं छोटं मंदिर बांधण्यात आलं. आज या परिसरात असणाऱ्या हनुमान मंदिराची जबाबदारी पाहणाऱ्या ठाकूर कुटुंबाकडे राजा मानसिंह यांच्या समाधीवर दिवा लावण्याकरिता राजस्थान मधून पैसे येत असल्याची माहिती अचलपूर येथील सुलतानपुरा परिसरातील रहिवासी किशोर गेरंज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.