हिंगोली Nagesh Patil Ashtikar : विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं चिन्हं दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं तक्रार केली आहे. प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं काम केलं नाही. त्यांना विधान परिषदेचा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आगाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीसाठी नांदेडला आले होते, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रज्ञा सातव यांनी विरोधात मतदान केलं : नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. "लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडी विरोधात काम केलं आहे. त्यांनी प्रचार केला नाही, असा मी आरोप केला नाही. पण महाविकास आघाडी विरोधात त्यांनी मतदान केलं," असा आरोप खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. "जर काँग्रेस पक्षानं त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं, तर आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करू," असा इशारा खासदार आष्टीकर यांनी दिला. दरम्यान विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रज्ञा सातव मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत.