कोल्हापूर Panchganga River Flood: शहरासह जिल्ह्यात पाऊस गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी आदी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडले आहेत. तर पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगा सध्या 37 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 79 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा आपली इशारा पातळी गाठण्यासाठी अवघी दोन फूट शिल्लक आहे.
कोल्हापुरातील पूरस्थितीविषयी बोलताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख (ETV Bharat Reporter) नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात शिरलं पाणी :कोल्हापुरात काल दिवसभर शहरात पावसाची संततधार सुरू राहिल्यानं पाणीपातळीत संथ गतीनं वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं आहे. दरम्यान काल शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी येथे दत्त मंदिरात पाणी आल्यानं गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच दक्षिणद्वार सोहळा पार पडला.
पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ :जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय, असं वाटू लागलं आहे. गेले 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून आज सकाळी आठ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 37 फूट इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. यामुळे पंचगंगा इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक असून आपली वाटचाल इशारा पातळीकडे सुरू ठेवली आहे. दरम्यान, पावसाचा जोर रविवारी असाच कायम राहिला तर पंचगंगा आज संध्याकाळपर्यंत इशारा पातळी गाठेल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक :पूरस्थिती बघता यंत्रणादेखील सतर्क झाली असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी स्वयंसेवक आणि एनडीआरएफची पथके सज्ज ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेस स्थलांतर करण्यासाठी चोख नियोजन करा. स्थलांतरित कुटुंबीयांसाठी निवारा व्यवस्था तयार ठेवा. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिल्या आहेत.
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 65000 क्युसेक्स विसर्ग : हवामान खात्याने पुढील दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिल्याने पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. जिल्ह्याला जरी येलो अलर्ट देण्यात आला असला तरी ग्रामीण भागात असलेल्या शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी यासह धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. यामुळे राधानगरी धरण 76.62 % भरलं असून यामुळे धरणाच्या पॉवर हाऊस मधून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तसेच घटप्रभा 8434, वारणा 1592, कोदे 936 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्यानं वाढ होत असून आता पर्यंत जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 2 राष्ट्रीय महामार्ग, 7 राज्यमार्ग आणि 12 जिल्हा मार्गांवर पाणी आले असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरण देखील 80 टक्के भरलं असल्यानं अलमट्टी धरणातून सध्या 65 हजार क्युसेक्स पाणी पुढे सोडण्यात येत असून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सातत्यानं समन्वय सुरू आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने कोल्हापूर सांगली शिरोळ इचलकरंजी हातकणंगले या भागातील लोकांना काही दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे :
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, रुकडी
ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी, जंगमहटटी
वेदगंगा नदी : म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, करडवाडी, हिरण्यकेशी नदीसाळगांव, निलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी, हरळी
दुधगांगा नदी : दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी
कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे, सरूड पाटणे
वारणा नदी : चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगांव खोची, शिगाव भोगावती नव हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, शिरगाव
कुंभी नदी : कळे, शेनवडे, मांडूकली, वेतवडे
कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाची वाडी १, नवलाची वाडी २
धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
घटप्रभा नदी : हींडगाव, कानडे-सावर्डे, अडकूर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली, पिळणी
तुळशी नदी : बीड
हेही वाचा :
- राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट - Maharashtra Weather Update
- मुसळधार पावसानं 'मुंबईची तुंबई', राज्य सरकारविरोधात काँग्रेसचं आसूड आंदोलन - Congress Asud andolan
- गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain