गोंदिया Heavy Rain in Gondia : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळं संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळं शहराजवळील फुलचूर नाल्याला पूर आला. नाल्यातील पाणी वाढल्यानं लगतच असलेली दोन मजली इमारत थेट नाल्यात कोसळली. यामुळं पाण्यात वाहून गेल्याने आईचा, तर घराच्या ढिगाऱयाखाली दबल्याने मुलाचा मृत्यू झाला.
मायलेकाचा मृत्यू :दीपिन अग्रवाल (२७) व किरण अग्रवाल (५०), अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल अग्रवाल (५२) हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. घराच्या ढिगाऱयाखालून दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या किरण अग्रवाल यांचा मृतदेह प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत आढळून आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
वाघ नदीत डिझेल टँकर गेला वाहून : गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र, त्याकडं नागरिक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळं वाघ नदीला पूर आला असून, ही नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीत एक डिझेल टँकर वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.